Anil Awachat (अनिल अवचट)

October 24, 2008

पुस्तक रसग्रहण : अमेरिका (रुपाली महाजन)

Filed under: Books — Manish @ 11:33 am

America-book-by-anil-awachatकाही नाव वलयांकित असतात, अमेरिका ह्या शब्दालाही तसं वलय आहे. जे चांगल-वाईट दोन्ही अर्थाने आहे. अनिल अवचट यांचे “अमेरिका” वाचायला घेताना प्रवासवर्णनापलीकडचा दॄष्टिकोन त्यात असेल ह्याची खात्री होती. त्याची कल्पना आपल्याला पुस्तकाची अर्पणपत्रिका वाचून लगेच येते.

“नशीब काढायला अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतातल्या (तरूण) भाग्यविधात्यांना … काळजीपूर्वक!!”

कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेलं अजूनही किती चपखल बसलयं.. उलट जरा जास्तच योग्य!

आयोवा इंटरनॅशनल प्रोग्रामच्या निमित्ताने अवचटांना तिकडे जाण्याचा योग आला होता. जगभरातून तिथे लेखक, कवी आले होते. “आयोवा प्रोग्राम”, “आयोवा मुक्काम” ह्यात प्रत्यक्ष तिथे काय पाहता-अनुभवता आलं त्याचा मागोवा आहे असं म्हणता येईल. पोलंड, युगोस्लाविया, सुदान, कोरिया, फिलिपीन्स, पाकिस्तान, थायलंड, इंडोनेशिया, इस्त्रायल, नायजेरिया अशा थोड्या हटके म्हणता येईल अशा देशांतून हे सगळे जमलेले होते. त्यामुळे बरचसं दुसऱ्या देशांबद्दलही आपल्याला वाचताना कळत जातं. प्रत्येकाच्या वागणूकीमधून तिथल्या संस्कॄतीचा आणि राहाणीमानाचा अंदाज येतो. काहींची वैशिष्टे पण त्यांनी सांगितलेत. सगळ्यात ठळक आणि आपलसं वाटलं ते पाकिस्तानच्या वाकसचं व्यक्तिमत्व. आपल्या सगळ्यांनाच नेहमी पाकिस्तान, तिथली माणसं ह्याची उत्सुकता असते. त्या निमित्ताने ह्यात अनेक गोष्टींचा उलगडा होतो. तिथे इतरवेळी ज्या अनौपचारिक गप्पा होत असत त्यातून अवचटांना, तिथल्या काही लेखकांवर त्यांच्या देशात कसे निर्बंध घातलेले होते ते कळलं. त्याउलट आपल्याकडे एखादा अपवाद सोडल्यास पूर्ण स्वातंत्र्य सगळ्याच बाबतीत असल्याचं दिसतं ज्याचा अभिमान वाटतो.
आयोवा मध्ये असताना दिवसाचे एकांतातले काही तास त्यांनी कसे घालवले ते “आयोवा मुक्काम” ह्यात लिहीलं आहे. आयोवा हे निसर्गरम्य छोट शांत शहर आहे. अतिशय संथ असलेल्या शहराची वैशिष्ट पण खासच आहेत. सगळा परिसर म्हणजे युनिव्हर्सिटीच्या कँपसचा एक भाग आहे. तिथल्या लायब्ररीतली भरपूर पुस्तक जी भारतात असताना वाचायची राहिली होती ती त्यांनी तिथे वाचली, व्हिडीओ सेक्शनमध्ये अनेक पिक्चर्स पाहिले. त्यांचा दिनक्रम नंतर नंतर इतका भरत गेला की सुरवातीला इथे नक्की काय करायचे कसं रहायचे इतके दिवस, असा विचार करणाऱ्या अवचटांना वेळ पुरेनासा झाला. अनेक ठिकाणी फिरले, जितकं पाहता येईल तितकं पाहिलं. अनेकांशी त्यांच्या ओळखी झाल्या, त्यांच्याशी झालेली जवळीक ह्यात त्यांचे दिवस भरगच्च होत गेले. आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते ज्या ज्या कुटुंबात गेले तिथे ते रमले त्यामुळे आयोवातला त्यांचा हा मुक्काम आपल्यालाही थक्क करुन टाकणारा आहे.

ह्या आयोवा प्रोग्राम व्यतिरिक्त ते अनेक शहरात गेले. अगदी “अमेरिकन” म्हणता येईल अशा ज्या विशिष्ठ गोष्टी त्यावेळी त्यांना आपल्यापेक्षा वेगळया जाणवल्या त्या “शॉपिंग”, “कचरा”, “टि.व्ही.” अशा लेखांमध्ये आहेत. शॉपिंग वाचताना वाटतं की ही सगळी संस्कृती तर अगदी जशीच्या तशी आपल्याकडे आली आहे. त्यात आलेला मॉलचा उल्लेख ज्यामुळे रिटेल दुकांनदारांवर झालेला परिणाम, मॉलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्याची रचना, पार्किंगची सोय, अगदी सगळं तसचं. पुढे अगदी तसचं टि.व्हीवरचा लेख वाचताना कळतं की प्रायव्हेट चॅनेल्सवर त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे तशाच प्रोग्राम्सचा भडिमार चालू असतो. न्यूज चॅनेल्सवरच्या तथाकथीत बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि सगळ्यात कहर म्हणजे प्रोग्राम्सच्यामध्ये चालू असणाऱ्या जाहिराती. ह्या सगळ्या गोष्टींचा तसाच अतिरेक आपल्याकडे चालू असतो. उलट आपल्याकडचं त्यांच्या प्रोग्राम्सच भ्रष्ट वर्जन, (अनरिऍलिस्टिक) रिऍलिटी शोज बघवत नाही. तसचं सगळ्यात जास्त कचरा निर्माण करणारा हा देश आहे आणि त्याची विल्हेवाट ते कशी लावतात त्याचं वर्णन “कचरा” ह्या लेखात आहे. प्रत्येक वस्तूला असलेलं पॅकिंग, सतत वापरले जाणारे टिश्यूज, पॅकिंगसाठी लागणाऱ्या ह्या वस्तू बनवण्यासाठी लागणारी केमिकल्स ह्याने होणारे प्रदूषण भयंकर आहे. त्याचाही प्रभाव आपल्या इथे दिसून येतो. ह्या लेखात शेवटी ग्रीन हाउस इफेक्ट, ओझोन होल ह्याचा उल्लेख आहे. तिथे राहून पी.एच.डी करणाऱ्या श्याम आसोलेकरांनी (ज्यांनी अलिकडे ठाण्यामध्ये गणपती विसर्जनासाठी कॄत्रिम तलावांची सुरवात केली) अवचटांना त्याची सविस्तर माहीती दिली होती. त्यात त्यांनी म्हंटलय की दक्षिण ध्रुवाजवळ जसे ओझोनला भोक पडले आहे तसेच उत्तर ध्रुवाजवळ पण पडलयं. ह्या संदर्भात अलीकडेच एक बातमी आली होती. ग्लोबल वॉर्मिंगमुळे “विल्किन्स” नावाचा एक हिमनग कोसळण्याच्या बेतात आहे. आणि गेल्या ५० वर्षात पृथ्वीवरच्या अन्य कोणत्याही ठिकाणापेक्षा उत्तर ध्रुवाकडील या परिसराला सगळ्यात जास्त मोठा फटका बसला आहे. शॉपिंग, टि.व्ही., कचरा ह्या तिन्ही लेखांत त्यांच्या अनुकरणाने आपल्या देशात निर्माण झालेलं आणि पुढे येणारं असं दोन्हीच चित्रण आहे.

“वकील” लेखामध्ये काही मजेदार प्रसंग सांगितले आहेत. तिकडे कोणीही कोणावर अगदी छोट्या गोष्टींसाठीही खटले भरत असतात (ज्याला तिकडे सू करणे म्हणतात.) अगदी एखाद्या मित्रावरसुध्दा! प्रत्येकाची इंश्युरन्स कंपनी हे खटले भरत असते किंवा चालवत असते. बऱ्याच प्रकारचे इंश्युरन्स तिकडे आहेत. पेशंट डॉक्टरवर अनेक प्रकारे खटले भरु शकतो. अलिकडे आपल्याकडेसुध्दा डॉक्टर स्वतःवर केस होऊ नये म्हणून अनेक प्रकारच्या टेस्ट्स करुन घ्यायला लावतात. ज्याचा पेशंटला त्रास होत असतो. आपल्याकडे अशी सोपी केस करण्याची पध्द्त आली तर अनेक डॉक्टरांचे हाल होतील ह्यात शंका नाही, अर्थात त्यात दोन्ही बाजूने धोका होऊ शकतो पण सामान्य माणसांचा त्यात झाला तर फायदाच होईल. ह्या लेखातले एक-एक किस्से वाचताना म्हणूनच आश्चर्य वाटतं.

अमेरिकेत शहरी भागात ज्या समस्या आहेत त्याची गंभीरता “व्यसनं”, “कौटुंबिक” ह्या लेखात मांडली आहे. व्यसनांमध्ये सिगारेटचे दुष्परिणाम तिथे लोकांना व्यवस्थित पटलेले असल्याने त्याबाबत ते जागृक आहेत. दारुच्या व्यसनावर आळा घालण्यासाठी पण प्रयत्न चालू असतात. दारु पिऊन अपघात होऊ नयेत म्हणून तिथे अनेक प्रकारे काळजी घेतली जाते. पण सगळ्यात गंभीर समस्या आहे ती ड्रग्जची. ड्रग्सचे आणि ते घेण्याचे वेगवेगळे प्रकार तिथे उपलब्ध आहेत. ड्रग्ज विक्रेत्यांना आळा घालण्यात सरकार कमी पडतं. त्यासाठी अनेक पळवाटा ह्या ड्रग लॉर्ड्सकडे आहेत. ड्रग्जचे मानसिक, शारिरिक दुष्परिणाम मग कुटुंबावर व्हायला लागतात. मुक्तांगणमध्ये व्यसनमुक्तीसाठी अजून काही करता येईल का? ह्या हेतूने तिथल्या एका सेंटरला अवचटांनी भेट दिली तेव्हा तिथल्या सायकियाट्रिस्टने सांगितलं की तिथे हे ऍडिक्टस मोठ्या प्रमाणावर ऍडमिट होतात पण ट्रिटमेंटच्यावेळी डॉक्टरची फसवणूक करतात ज्यामुळे ते रिलॅप्स होत रहातात. तिथल्या कौटुंबीक समस्या आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत. लग्नाविषयी तिथे वेगळी मत आहेत. त्याला अनुसरुन मग सिंगल पॅरेंट, बॅटर्ड चिल्ड्रेन, चाईल्ड इन्सेंस्ट अशा समस्या तिथे आहेत. ह्या समस्यांचा परिणाम म्हणजे बरिचशी मुलं तिथे ह्या ना त्या कारणाने व्यसनाधिन होत असतात. तिथे एकमेकांबद्दल आपुलकी, स्नेह हा अभावानेच असावा. एकटेपणा हा तिथला स्थायीभाव आहे जो कोणत्याही वयात तिथे आढळतो विशेषतः वॄध्दापकाळात अनेकांना भेडसावणारी ही समस्या आहे. ह्या समस्या म्हणून तिथे अशा एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. अशा समस्यांवर चर्चा होतात, टि.व्हीव्दारे प्रचार केला जातो त्यामुळे बरीच जनजागृती होत असते.

“पोर्टलँड”, “रेडवूड-ग्रँड कॅनियन”, “लास व्हेगास” ह्या लेखांमध्ये त्यांच्या वैशिष्टपूर्ण शैलीत त्यांनी ह्या ठिकाणची वर्णनं केली आहेत. कलासक्त अशा मांडणीशी निगडीत असलेलं पोर्टलँड, रेडवूडच्या जंगलातल्या झाडांची माहिती आणि ग्रँड कॅनियनच वर्णन ह्याचा वाचूनच आनंद घ्यायला हवा इतकं ते वाचताना डोळ्यासमोर येत जात. लास व्हेगासमध्ये अगदी उलट म्हणजे सगळं मानवनिर्मित मनोरंजनच तिथे होतं त्यामुळे काही वेळानंतर त्या कृत्रिमतेचा त्यांना वीट आला ह्यात आपल्याला आश्चर्य वाटत नाही.

इथून जाताना ओळखीच्यांचे फोन नंबर, पत्ते अवचटांनी नेले होते. ज्यात त्यांचे स्नेही प्रा. वसंत देशपांडे उर्फ व्हि.डी ह्यांची एक मैत्रीण सँड्राचा पण होता. “सँड्रा” ह्या वेगळ्या लेखात तिच व्यक्तिमत्व आणि कौटुंबिक जीवनाचं चित्रण केलेलं आहे. तिच्या मदतीने त्यांना मेक्सिकोलाही जाता आलं होतं. मेक्सिकन मजुरांवरील वाचनामुळे त्यांना इथून जातानाच मेक्सिकोबद्दल आकर्षण होते. आपल्याकडच्या उसतोडणी कामगारांसाठी त्याचा काही फायदा होऊ शकेल म्हणूनही उत्सुकता होती. मेक्सिकोपर्यंत जातानाचा प्रवास, तिथली माणसं, त्यांच दारिद्रय, आतमधला परिसर, आजुबाजूचं वर्णन जे बरचस भारतातही अनेक ठिकाणांशी साम्य असलेलं आहे जे ह्या “मेक्सिको” लेखात आहे. आपल्या इथल्या उसतोडणी कामगारांच्या समस्येसारखी असलेली एक समस्या म्हणजे मेक्सिकन मजूरांचे अमेरिकेच्या पूर्वेला स्थलांतर होणं. शेतीची काम करणारे मजूर जे मुख्यतः मेक्सिकन आहेत अशांच्या समस्या “स्थलांतरीत” मध्ये आहेत. हे मजूर कमी पैशात, कमी सोयी असलेल्या ठिकाणी राहून आपली उपजिविका करत रहातात. स्थलांतरीतांना तिथे तुच्छ वागणूक मिळत असते. त्यांना सीझर शॅवेझ सारखा नेता लाभला ज्याने फक्त मेक्सिकनच नव्हे तर फिलोपिनो, चायनीज व अमेरिकन ब्लॅक्स अशा मजुरांना एकत्रित करून संघटना बांधली.
इथून तिकडे जाणारे भारतीय ज्यात गुजराथी लोकांचा भरणा आहे. तिथे त्यांनी अमेरिकन व्हिसा, ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी केलेल्या करामती “भारतीय” लेखात सुरुवातीला सांगितल्या आहेत. शिवाय भारतीयांच तिथे असलेलं स्थान, त्यांचे काम-धंदे, त्यांच्या मुलांची असलेली द्विधा मनस्थिती ह्याबद्दलचे विचार मांडले आहेत. एकूणच भारतीयांची तिथली जीवनपद्घती आहे. तिथे जन्माला आलेल्या पिढीचे विचार, त्यांना पडलेले प्रश्न आपल्याला निरुत्तर करतात. अमेरिकेला मेल्टिंग पॉट म्हंटल जातं. अमेरिकेमध्ये राहून कष्ट, कर्तबगारिने माणूस श्रीमंत होऊ शकतो. पण असं असलं तरी तिथे माणसामाणसात अनेक प्रकारे भेदभाव केले जातात. त्याची अनेक उदाहरण “मेल्टिंग पॉटमध्ये” त्यांनी सांगितली आहेत. अमेरिकेचा इतिहास आणि तिथे गेले असतानाचा वर्तमान ह्याची माहिती आपल्याला कळते. अमेरिकन माणसांची मानसिकता कशी आहे हेही प्रकर्षाने कळतं. “रेड इंडियन्स” वरच्या लेखात तिथली परंपरा, संस्कॄती सांगितली आहे. टूरिस्ट लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यात कसा कृत्रिमपणा आणला होता हे त्यात सांगितलं आहे.

सगळ्यात शेवटी त्यांना अमेरिका कशी वाटली हे “चार शब्द” मध्ये सांगितल आहे. हे पुस्तक आल्यानंतर जवळजवळ दीड वर्षांनंतर लिहिलेलं असून प्रत्येक गोष्ट त्यांनी त्यावेळी नुकतीच घडल्यासारखी लिहिली आहे. तिकडे गेल्यानंतर जे काही पाहिलं त्याचा दोन्ही बाजूने त्यांनी विचार केलेला आहे. त्यांच अनुकरण आपण करतच असतो. ह्या लेखात त्यांनी जे म्हंटल आहे की आपल्याकडे पुढे ज्या समस्या निर्माण होतील त्या त्यांना अमेरिका पाहताना दिसल्या ज्या आता प्रत्यक्षात आपण अनुभवतो पण आहोत. तिथला कॄत्रिमपणा बराचशा ठिकाणी आता इथेही दिसतो.

अमेरिकेत जरी समस्या असल्या तरी सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यावर उपाय पण केले जातात. लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळतो त्यामुळे लोकांमध्ये जागरुकता आहे. हे पुस्तक बरचं आधी लिहिलेलं आहे त्यामुळे अनेक बदल सगळीकडे झाले आहेत. अमेरिकेमध्ये इतर अनेक देशांतले लोक रहिवासी म्हणून आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यानंतर तिथे अनेक बदल झाल्याचे आपण वाचतो. तिथल्या नागरिकांचा जगाकडे विशेषतः तिथे रहाणाऱ्या एशियन्सकडे बघण्याच्या दॄष्टिकोनात फरक पडला आहे. अमेरिकेचा इतर देशांबद्दल असलेला आकस, दुस्वास नेहमीच आपल्याला दिसून येतो. पण लोकांना सार्वजनिक भान, शिस्तदेखील आहे. ह्या पुस्तकातून मला जशी अमेरिका दिसली तशीच सगळ्यांना दिसली असेल असे नाही जे तिथे रहात आहेत किंवा जाऊन आले आहेत त्यांना काही वेगळही ह्या पुस्तकातून सापडेल. भरपूर किस्से, प्रसंग, अनुभव ह्यांनी हे पुस्तक मनोरंजक झाले आहे. प्रत्येकाने विशेषतः तिथे रहाणाऱ्या भारतीयांनी नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे.


अमेरिका : रुपाली महाजन

Blog at WordPress.com.