Anil Awachat (अनिल अवचट)

September 25, 2007

पुस्तक रसग्रहण : आप्त (तेजश्री वाळके)

Filed under: Books — walktejas @ 1:21 pm

Aapta - by Anil Awachatआप्त पुस्तकात अनिल अवचट यांनी त्यांना भेटलेल्या, त्यांना आवडलेल्या विविध व्यक्तींचे चित्रण केले आहे.

जसे बोलतो तसे लिहायचे’ हे अवचटांच्या लिखाणाचे नेहमीचे सूत्र आहे. त्याचबरोबर जो विषय आवडेल, रुचेल त्यावरच लिहायचे हेही त्यांच्या लिखाणाचे दुसरे सूत्र आहे. त्यामुळे ह्या पुस्तकामधे रस्त्यावर चिवडा विकणाऱ्या चिवडेवाल्यापासून ते अमेरिकेमध्ये ’इंटरनॅशनल रायटर प्रोग्रॅम’ मधे प्रोग्रॅम ऑफिसरचे काम करणाऱ्या मिनिता ह्या मेक्सिकन स्त्रीपर्यंत वेगवेगळ्या व्यक्तीविषेशांचे चित्रण लेखकाने केले आहे. अवचटांच्या लिखाणात जाणवणारा सामाजिक दृष्टीकोन ह्या सर्व व्यक्तीचित्रांतूनही जाणवतो.

तीन व्यावसायिक’ मधे त्यांनी चिवडेवाला, इस्लामपूरचे एक वृद्ध शिंपी आणि त्यांचा बॅंड पथक चालवणारा मुलगा ह्या तीन वेगळ्याच व्यवसायात असलेल्यांचे चित्रण केले आहे. ’चिवडेवाला’ त्याच्या स्वत:च्या धंद्यावरील निष्ठा, तसेच चवीत सातत्य राखण्यासाठी घेत असलेली मेहेनत ह्या गुणांनी चकित करुन सोडतो. लहान प्रमाणात व्यवसाय करीत असतानाही तो करीत असलेला ग्राहकाच्या तब्येतीचा विचार आणि माणसे जोडण्याची त्याची हातोटी ह्याचे खूप छान वर्णन ह्यात आहे.

इस्लामपूरचे ’काका वर्णे’ म्हणजे एक वयस्कर शिंपी, लहान गावात राहून बटवे, चंच्या, पिशव्या इ. शिवणारे आणि फाटलेल्या कपड्यांना शिलाई मारुन देणारे. पण आपल्या कामात रंगून गेलेले. पण ह्यातसुध्दा त्यांची सौंदर्यदृष्टी आणि कामातील परफेक्शन दिसून येते.
त्यांचा मुलगा कुमार ह्याचा तर एक वेगळाच व्यवसाय. वरातीपुढे बॅंड वाजवण्याचा व्यवसाय हा पदवीधर मुलगा करतो. त्या व्यवसायातील कथा आणि व्यथा त्याच्याकडून कळतात.

’मिनिता सांतिझो’ हे एक वेगळेच व्यक्तीचित्र आहे. अमेरिकेतील मेक्सिकन लोकांचे जीवन, त्यांना जाणवणारा वंशद्वेष, तेथिल राजकारण ह्याचाही इथे उल्लेख येतो. मिनिताचा उत्साही खेळकर स्वभाव आणि काम करण्यातील उस्फूर्तता आपल्याला मोहवते. तिचा हळवा, प्रेमळ स्वभाव आपल्याला पण जीव लावतो. ह्या खूप छान अशा पार्श्वभूमीवर तीच्यावर येणारी संकटे, तिची होत जाणारी घुसमट मन विषण्ण करुन सोडते.

’जेपी’ हा मेंटल हॉस्पिटलमधिल एक पेशंट. चौदा वर्षे हॉस्पिटलमध्ये राहीलेला. मधूनमधून रिलॅप्स होणारा पण इतर वेळी चांगले काम करुन दाखवणारा. एका मेंटल पेशंटमुळे त्याच्या कुटुंबाचे आयुष्य कसे बदलते, त्यांना कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागतो ते इथे जाणवते. त्याचबरोबर लेखकाचा एका मेंटल पेशंट मधिल माणूस शोधायचा प्रयत्न पण दिसून येतो. एकीकडे अवचटांच्या घरच्यासारखाच झालेला आणि स्वत:च्या कुटुंबाशी फटकून वागणारा ’जेपी’ अशी त्याची दोन रुपे समोर येतात.

मारुतराव सरोदे’ हे एका आडखेड्यात रहाणारे आणि सतत नवनवीन यंत्र-निर्मितीचा ध्यास घेतलेले शेतकरी. शेतीच्या कामात उपयोग व्हावा, वेळ वाचावा आणि कष्ट कमी व्हावेत म्हणून त्यांनी केलेली यंत्रे थक्क करतात. आसपास मिळेल त्या सामुग्रीतून, कमी खर्चात ही यंत्रे ते बनवतात. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असूनही ते आशावादी आहेत. उपलब्ध असणाऱ्या गोष्टींतून स्वत:च्या बुध्दीच्या जोरावर यंत्रे निर्माण करणारा हा माणूस कुठल्याही संशोधकापेक्षा कमी नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळातील जुन्या समाजवादी कार्यकर्त्याचा एक व्यक्तीविशेष ’विनायकराव’ मधे आपण वाचतो. त्यांची साधी रहाणी, व्यवस्थितपणा आणि अफाट व्यासंग ह्याचे वर्णन लेखकाने वेगवेगळ्या उदाहरणांतून केले आहे. त्या दोघांतील एक विशेष नाते खूप सुंदर आहे. कमीत कमी गरजांमधील त्यांचे जगणे आणि सामाजिक कामातील नवीन कार्यकर्त्यांना होणारे त्यांचे मार्गदर्शन वेगवेगळ्या घटनांमधून दिसत रहाते. अनिल अवचटांच्या वैचारिक जडणघडणीमधे त्यांचा बराच वाटा असल्याचे जाणवते.

आजच्या भ्रष्ट आणि किडलेल्या सरकारी व्यवस्थेत ’पाटीलसाहेब’ हे एक अपवाद म्हणून आपल्यासमोर येतात आणि इथेपण काहीतरी आशा आहे हा दिलासा देऊन जातात. एका पोलिस ऑफीसरचे हे व्यक्तीचित्र त्याच्यातील पोलीस आणि माणूस ह्यांचे फारच छान असे दर्शन घडवते. त्यांची काम करण्याचा झपाटा, दूरदृष्टी व तत्परता हे गुण विशेष करुन जाणवतात. तसेच हे करताना त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होताना दिसत नाही. त्यांचे ’खाकी वर्दीतला कार्यकर्ता’ हे वर्णन अगदी अचूक वाटते. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी चाकोरीबाहेर जाऊन केलेले प्रयत्न त्याचे एक उदाहरण म्हणता येईल.

’दोन’ गुरु हे अवचटांचे योग शिक्षक आणि मसाज करणारे यांचे चित्रण आहे. ’आगाशे’ हे एक योग शिक्षक. पहाटे योग वर्ग चालवणारे आणि दिवसभर दुकान. दोन्ही अत्यंत प्रामाणिकपणे. योग शिकवण्याची तळमळ, वक्तशीरपणा, त्यांच्या स्वभावातील लोभसपणा खूप छान वर्णन केला आहे. आगाशे नुसता योग शिकवित नाहीत तर ते योग जगत असतात.

त्याच क्लासमध्ये येणारे, योगासने करताना स्नायू दुखावला तर मसाज करणारे ’साने’ हे ह्यातील अजून एक व्यक्तीचित्र. निरागस, निगर्वी, कृतज्ञ असणारे. पैसे घेऊन मसाज करतात हेच माहित नाही त्यांना. स्वत:च्या कौशल्याचा अनेकांना उपयोग करुन देणारे साने स्वत:च्या कुटुंबाच्या बाबतीत मात्र ते कौशल्य उपयोगात आणू शकले नाहीत ह्याचे वाईट वाटते.

’क्लासो’ हा ही एक मेंटल पेशंट. चाळीस वर्षे जुना. खरंतर पूर्ण बरा झालेला आहे पण तरीही तिथेच राहून काम करत असलेला. माळीकामात मग्न असलेला क्लासो हॉस्पिटलचे रुक्ष वातावरण हिरवेगार बनवतो. त्याला झाडांबद्दल, प्राण्यांबद्दल अपरंपार प्रेम आहे. त्याची तो जीवापाड काळजी करतो. झाडे जगवण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या लढवित असतो. त्याचबरोबर त्याच्या वॉर्ड मधील पेशंटची मायेने काळजीपण घेताना दिसतो. त्याचा कामाचा झपाटा त्याच्या वयाची जाणीव नाहीशी करतो.

ह्या पुस्तकातील सर्वच व्यक्तीचित्रे स्वत:च्या कामात रंगून गेलेली, त्या कामाचा आनंद घेत घेत त्यातून लोकांसाठी काही करणारी, त्यांना पण आनंद देणारी अशी आहेत. ह्याशिवाय अजून एक व्यक्तीचित्र ह्यांच्या पार्श्वभूमीवर जाणवत रहाते, ते म्हणजे सुनंदाताईंचे. विशेषत: पेशंटच्या संदर्भात. तसे तर अवचटांच्या लिखाणात नेहमीच ते जाणवत असते. पण ते बरेच वेळा कौटुंबिक किंवा मुक्तांगणशी संबंधित असते. ह्या पुस्तकात त्यांच्या मेंटल हॉस्पिटलमधील कामाची माहीती होते. डॉक्टर म्हणून त्यांचे पेशंटशी असलेले नाते, त्यात त्यांनी जपलेली माणूसकी, त्यांचे कष्ट बघून त्यांच्या व्यक्तीमत्वाचा अजून एक पैलू दिसतो.

अशी ही वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीतील वेगवेगळ्या वयाची माणसे. अवचटांना एकूणच माणसांत रमण्याची आवड आहे, उत्सुकता आहे. खूप रस घेऊन त्यांच्याशी बोलतात, आणि त्यांच्या नेहमीच्या शैलीमधे लिहीलेले वाचताना आपण ही त्यात अगदी रंगून जातो. सामाजिक कामासाठी फिरतानासुध्दा ते माणसे वाचत असतात. त्याचे निरीक्षण करत असतात. त्यातूनच काही त्यांचे आप्त बनतात. वाचताना आपल्यासाठी सुरवातीला फक्त व्यक्तीचित्रं असतात पण वाचून झाल्यावर आपणही त्यात गुंतत जातो.


आप्त : तेजश्री वाळके

Blog at WordPress.com.