Anil Awachat (अनिल अवचट)

October 19, 2007

सुनंदाला आठवतांना पुस्तिका

Filed under: General — Manish @ 9:39 am

मुक्तांगणने सुनंदाला आठवतांना ही संपुर्ण पुस्तिका उपलब्ध करुन दिली आहे. ती येथे वाचता येइल –
http://www.muktangan.org/pdfs/Sunandala.pdf

आनिल अवचट ह्यांनी परवानगी दिल्यास ती blog वरही उपलब्ध केली जाईल.

October 12, 2007

Help/FAQ page added

Filed under: General — Manish @ 8:27 pm

I have added help/FAQpage to the blog – https://anilawachat.wordpress.com/help-faqs/
You can get answers to commonly asked questions there and aadding photos to Anil Awachat group on flickr.com

Also, bibliography is updated with latest review links. All these pages are available under section “Pages” on the right hand side of this blog. Do add your comments there!

October 9, 2007

पुस्तक रसग्रहण : मोर (रुपाली महाजन)

Filed under: Books — Manish @ 8:25 pm

Mor - by Anil Awachat‘मोर’ हा ८० च्या दशकात जास्त करुन दिवाळी अंकात आलेल्या लेखांचा संग्रह आहे. पुस्तकाच्यामागे लिहिल्याप्रमाणॆ हे सामाजिक प्रश्नांवर आधारीत नसलं तरी लेखांमध्ये आलेले संदर्भ, घटना आपल्याला विचार करायला भाग पाडतात. फ़िरत असताना आलेले अनुभव, काही लहानपणच्या आठवणी आणि घडलेल्या काही घटनांवर लेखक अनिल अवचट यांची त्या त्या वेळची प्रतिक्रिया ह्यात आहे.

पुस्तकाचं नाव वाचल्यावर मोराबद्दल त्यांनी काय लिहिलं असेल ह्याची उत्सुकता होती. मुर्तिजापूर येथे गेले असताना एका बागायतदाराच्या घरी मोर होता. मोर दिसल्यावर साहजिकच त्यांना आनंद झाला. मोरमध्ये त्यांनी केलेले मोराचं वर्णन वाचून आपल्याला तो डोळ्यासमोर दिसू लागतो. नंतर त्याचं निरीक्षण करताना मात्र त्यांना मोराचा उथळपणा जाणवू लागला. त्याच्या लाडीक सांभाळाने त्याला आक्रमक केले होते ज्यामुळे त्याच्याबद्दलचं त्यांच कौतुक कमी झालं होतं. कुठचाही प्राणी/पक्षी अगदी मनुष्य प्राणीदेखील अति लाडाने कसा बिघडतो किंवा त्याची स्वतःची ओळख कसा गमावतो, हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. पुस्तकाच्या मुखपॄष्ठावर सुभाष अवचटांनी काढलेला चौकटीतला (बंदिस्त) मोर, लेख वाचून झाल्यावर खूप काही सांगून जातो.

‘वंशाचा दिवा’ या लेखातून त्यांनी नाना पेठेतल्या त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या पेशंट्सची मनस्थिती, आजुबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असणारी विचारसरणी यांबद्दलचे अनुभव लिहीलेत. तर ‘कमिशन’ ह्या लेखात त्या दवाखान्यासाठी लागणारी सामग्री घेण्यासाठी गेलेले असताना त्यांनी कमिशनचे पैसे कसे नाकारले आणि त्यावेळी क्षणभरासाठी का होईना झालेली विचारांची घालमेल अगदी प्रामाणिकपणे लिहिलेय. नंतर त्या गोष्टीची आठवण ठेवून जाणिवपूर्वक मित्राची परत केलेली टेप ही त्यांची कॄती आपल्याला विचार करायला लावते.

‘निष्ठा’ आणि ‘नवरा’ मध्ये आलेल्या दोन्ही व्यक्तिंच आपल्या संसार आणि कुटुंबावर प्रेम आहे. अवचटांनी आणि त्यांच्या पत्नी सुनंदा ह्यांनी सीमाला शक्य ती सगळी मदत केली. तिच्यावर आलेल्या प्रसंगातही तिची नवऱ्याप्रित्यर्थ असलेली निष्ठा आपल्या मनाला हुरहूर लावून जाते. किंवा ‘नवरा’ ह्या लेखात एका केळेवाल्याची आपल्या कुटुंबाबद्दल असलेली ओढ व्यक्त केलेय ज्यावरुन त्यांनी आपणही इतके समजूतदार नसल्याची गोड कबूली दिलेय.

‘खेळ’, ‘कोंबडी’, ‘मूल’, ‘कुत्र्याचं पिल्लू’, ‘ग्रहण’ ह्या लेखांमधून त्यांच्या लहान मुलांबरोबर झालेल्या भेटी आणि त्यांच्या मुलींच्या मुक्ता-यशोदाबरोबरच्या लहानपणच्या आठवणी आहेत. ग्रहणमध्ये स्टँड्वर भेटलेल्या निरागस मुलीच्या मनात असलेले सामाजिक जातीभेदाविषयीचे विचार ऐकून प्रथम त्यांना धक्का बसला. पण नंतर त्यांनी तिच्याच भाषेत तिचे गैरसमज दूर करण्याचाही प्रयत्न केलाय. कित्येकदा आपण लहान मूलांसमोर अशा गोष्टी बोलून जातो ज्याचा प्रभाव इतका असतो कि त्यांना त्याच गोष्टी खऱ्या वाटून ते त्यानुसार वागू लागतात. म्हणूनच सरतेशेवटी त्यांनी त्यांच्या ह्या कृतीतूनही आपल्याला ह्या सगळ्याचा विचार करायला भाग पाडलयं. तसच ‘कोंबडी’ आणि ‘कुत्र्याचं पिल्लू’ यांमध्ये मुक्ता-यशोदा यांच प्राण्यांवरच प्रेम दिसून येतं. लेखात आलेल्या दोन्ही प्रसंगाच्यावेळी त्या दोघींची प्राण्यांबद्दलची दिसून आलेली निरागसता ठरवून जपण्याचा प्रयत्न अवचटांनी केलाय, हे आपल्याला कोंबडीच्या प्रसंगावरुन त्यांनी मांसाहार सोडला ह्यावरुन पण दिसून येतचं. हे सगळे लेख वाचताना एक गोष्ट जाणवते की त्यांनी प्रत्येकवेळी लहान मुलांच्या दॄष्टिकोनातून विचार केलाय ज्याचा हल्ली लोकांना फ़ार विसर पडत चालल्याचं आपल्याला दिसतं.

‘पाऊस’ ह्या लेखाचे मात्र तीन वेगळे भाग आहेत. त्यातल्या दोन भागात मुंबईच्या तर एकात कोल्हापूरच्या पावसात आलेले बरे वाईट अनुभव मांडले आहेत. मुंबईत कामानिमित्त आलेले असताना अवचटांना मुंबईच्या तुफ़ानी पावसाचा सामना करावा लागला. त्या पावसात फ़िरुन त्यांनी त्याचा आनंद घेतला खरा पण ह्या पावसात मॄत्यूमुखी पडलेल्या माणसांच्या बातमीने त्यांनी पावसात फ़िरुन घेतलेल्या आनंदावर पाणी फ़िरले आणि ते स्वतः त्यावेळी तेथे नव्हते ह्याच शल्य त्यांना वाटत राहिलं. त्यांची नेहमी दिसून येणारी सामाजिक बांधिलकी आपल्याला इथे दिसून येते. मुंबईतलाच दुसरा पाऊस त्यांनी लोकल प्रवासात अनुभवलाय. लोकल ट्रेनमधील गर्दी, बाहेर कोसळणारा पाऊस ह्या सगळ्याचं वास्तव वर्णन शहारा आणणारं आहे. मुंबईच्या पावसात घेतलेले हे दोन्ही अनुभव फ़ार आधीच्या काळातले आहेत पण आजही त्यात फ़ारसा बदल झालेला आपल्याला दिसत नाही. दोन वर्षांपूर्वीच्या २६ जुलैच्या आठवणी अजूनही पुसल्या गेलेल्या नाहीत त्या संदर्भाने पाहता पावसातल्या ह्या दोन अनुभवांमुळे सरकारी कामकाजातल्या त्रुटी आणखीच दिसून येतात. पण तोच कोल्हापूरचा पाऊस ह्याच्यापेक्षा खास वेगळा असल्याचा जाणवतो. तिथल्या अजब पुस्तकालयात पाणी शिरल्यावर सगळ्यांची एकच धावपळ झाली. पुस्तकं उचलून ठेवत असताना त्यांना त्यात त्यांचच एक पुस्तक दिसल्यावर थोडा धक्काच बसला. पुस्तकांची झालेली केविलवाणी अवस्था त्यांना पाहवली नाही. त्याचबरोबर तिथे काम करणा-यांची पुस्तकांबद्दलची मानसिकताही त्यांनी अगदी अचूक टिपलेय.

हे लेख त्यांचे अनुभव आणि आठवणी असल्यामुळे त्यातल्या ‘पोस्ट’, ‘प्रवास’, ‘नदी’, ‘बत्ती’ अशा लेखांमधून ओतूरचे वर्णन फ़ार ओघाने आलयं. त्यात कधी त्यावेळचा प्रवास कसा होता ह्याचे वर्णन आहे तर कधी पोष्टाबद्दल त्यांना लहानपणी वाटलेलं आकर्षण आहे. नदीचं त्यावेळचं रुप आणि त्यानंतर अत्ताचं तिचं बदललेलं स्वरुप आहे. त्यांच ओतूरवर असलेलं प्रेम आपल्याला नेहमीच त्यांच्या लेखनातून दिसून येतं. म्हणून अनेकदा त्यांच्या ह्या आठवणी सहज त्यांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत असतात जसं एकदा फ़िरत असताना दिसलेल्या बत्तीमुळे, ओतूरच्या काळोखातल्या त्यांच्या आठवणीही उजळून निघालेल्या आहेत ज्याचं वर्णन त्यांनी बत्ती ह्या लेखात केलयं. ह्या लेखांमध्ये जसं ओतूरचे वर्णन आहे तसं ‘किल्ला’, ‘वेताळ-टेकडी’, ‘संध्याकाळ’, ‘अंधार’ ह्या लेखांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणची वर्णन आहेत आणि ती थोडी वेगळ्या प्रकारची पण आहेत. रंडका किल्ल्याच वर्णन किल्ला ह्या लेखात आहे. वेगळी बांधणी असलेला ह्या किल्ल्याच वैशिष्टय म्हणजे इथे एकही लढाई लढली गेलेली नाही ज्याच्यावरुन त्याच नाव पडलय. तसच वेताळ-टेकडीवर गेलेले असताना त्यांना सापडलेल्या वेगळ्या आकारांच्या आणि छटांच्या दगडांचे वर्णन वेताळ-टेकडीत केलयं. संध्याकाळ मध्ये नदीत सोडलेल्या दिव्याच छान वर्णन आहे. तर दिव्यामुळे अंधाराला जास्तच आलेली गुढता अंधारमध्ये विरोधाभासाने आलेय. एकप्रकारे वर्णन हा ह्या लेखांचा गाभा आहे असं आपल्याला म्हणता येईल.

वरचे लेख एकूणच एकमेकांशी संबंधित असल्याच आपल्याला दिसत. पण ह्या व्यतिरिक्त ‘वाडा’, ‘झाड’, ‘नशा’, ‘भिकारी’, ‘चाहता’, ‘कॅबरे’ असेही लेख आहेत जे थोडेसे वेगळे असल्याचे जाणवते. वाडामध्ये संस्थान खालसा होऊनही तिथल्या महाराजांना असलेला पोकळ अभिमान आणि जोगतिणींच्या प्रश्नावर लिहीलयं. नंतर एका झाडात त्यांनी प्राण्यांच्या चेहऱ्यांची कल्पना केलेय. नशामध्ये दारुच्या अतिसेवनामुळे मिळालेला धडा आहे तर कुतूहल म्हणून कॅबरे पहायला गेले असताना तिकडे मिळालेला अनुभव निव्वळ शहारा आणणाराच आहे. असे ह्या लेखांमधले संदर्भ निराळे आहेत.

‘दुपार’ आणि ‘मारवा’ ह्या दोन्ही लेखात संगीताबद्दलची त्यांची जाण आणि आवड आपल्याला दिसून येते. मेडिकल इंटर्नशिपच्या वर्षात असताना त्यांना एकदा काही कारणामुळे मित्राबरोबर टळटळीत दुपारी उन्हात वेळ काढावा लागला होता. दुपार, त्यातही दुपारचं उन हे नुसते शब्द जरी उच्चारले तरी आपल्या कपाळावर सुक्ष्मशी का होईना आठी येतेच तिथे आजुबाजूचा निसर्ग आणि ऎकू येत असलेला राग सारंग ह्यांची सांगड घालून त्यांनी ती दुपारही रंगतदार केली आहे. छोट्या छोट्या लेखांच्या ह्या संग्रहाचा शेवट एखाद्या मैफ़िलीप्रमाणे मारवा रागाने केला आहे. प्रवासात एकदा त्यांची राव ह्या सतार वादकाबरोबर ओळख झाली. थोडावेळाने त्यांनी संध्याकाळी वाजवला जाणारा मारवा सतारीवर वाजवायला सुरवात केली. तो प्रवास मग अवचटांनी मारवा आणि बाहेरच्या सुंदर आणि थोडया वेगळ्या दिसणाऱ्या निसर्गाबरोबर केला. हा लेख वाचताना आपण पण सहसा न पाहिलेल्या अशा निसर्ग वर्णनामुळे त्यात अगदी गढून जातो.

अतिशय सहज आणि स्वाभाविक अशी शैली आपल्याला त्यांच्या लिखाणातून नेहमीच दिसून येते. जे जे वाटलं ते ते लिहीलं अशी त्यांना सहजगत्या अवगत असलेली त्यांची प्रामणिक पद्धत आहे. शिवाय डोळ्यासमोर एखादी गोष्ट उलगडवून दाखवणारी त्यांची वर्णन पद्धत कधी कधी एखाद्या कथेप्रमाणे उत्कंठा वाढवते. ह्याइथे लेखांमध्ये आलेले छोटे-मोठे तपशील आपल्याला आश्चर्यचकित करुन टाकतात तसचं काही ठिकाणी उदाहरणार्थ कॅबरेमध्ये दिलेले तपशील जरा अनावश्यकदेखील वाटले. पण जस ते एखाद्याठिकाणी प्रांजळ कबुली सहज देउन जातात तसच हे असावं. त्यांच्या छोट्या कृतींमधूनही आपल्याला ते बरच काही सांगून जातात परत कुठेही मुद्दाम काही शिकवण्यासाठी असा आव त्यांच्या लिखाणात नसतो म्हणून वाचायला आणखीनच छान वाटतं. जस हे मोर आहे…!!


मोर : रुपाली महाजन

Create a free website or blog at WordPress.com.