Anil Awachat (अनिल अवचट)

November 18, 2018

अनिल अवचट ह्यांच्या अनुभव २०१८ दिवाळी अंकातील ‘गुणगुणसेन’ या लेखातून

उस्ताद अमीर ख़ाँ असेच संगीत हाच प्राण असलेले आणि त्यातच देहभान हरपून गेलेले कलावंत. ‘गुणगुणसेन’ ह्या लेखात अनिल अवचटांनी त्यांच्या अशाच काही आठवणी सांगितल्या आहेत – एकदा सरोदवादक अमजद अलींबरोबर प्रेक्षागृहात मध्यरात्र होईपर्यंत दंग होऊन एकटेच गात होते, कोणीही प्रेक्षक नसल्याचे त्यांच्या लक्षातही आले नाही. हे ते दोन किस्से –

amir-khan-1

amir-khan-2

शेवटी उस्ताद अमीर ख़ाँच्या गाण्याविषयी, भीमसेन जोशींच्या उधृतासकट –

amir-khan-3

अनुभवच्या अंकाविषयी मी दुसर्‍या ब्लॉगवर एक वेगळा लेख लिहिला आहे, तो इथे वाचता येईल – कसे हरपते असे देहभान?

July 8, 2016

संभ्रम आणि धार्मिक या त्यांच्या पुस्तकांबद्दल बोलताना अनिल अवचट

स्वतः अनिल अवचट त्यांच्या “संभ्रम” आणि “धार्मिक” या पुस्तकांबद्दल बोलतात आहे, जरूर बघा –

October 24, 2008

पुस्तक रसग्रहण : अमेरिका (रुपाली महाजन)

Filed under: Books — Manish @ 11:33 am

America-book-by-anil-awachatकाही नाव वलयांकित असतात, अमेरिका ह्या शब्दालाही तसं वलय आहे. जे चांगल-वाईट दोन्ही अर्थाने आहे. अनिल अवचट यांचे “अमेरिका” वाचायला घेताना प्रवासवर्णनापलीकडचा दॄष्टिकोन त्यात असेल ह्याची खात्री होती. त्याची कल्पना आपल्याला पुस्तकाची अर्पणपत्रिका वाचून लगेच येते.

“नशीब काढायला अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतातल्या (तरूण) भाग्यविधात्यांना … काळजीपूर्वक!!”

कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेलं अजूनही किती चपखल बसलयं.. उलट जरा जास्तच योग्य!

आयोवा इंटरनॅशनल प्रोग्रामच्या निमित्ताने अवचटांना तिकडे जाण्याचा योग आला होता. जगभरातून तिथे लेखक, कवी आले होते. “आयोवा प्रोग्राम”, “आयोवा मुक्काम” ह्यात प्रत्यक्ष तिथे काय पाहता-अनुभवता आलं त्याचा मागोवा आहे असं म्हणता येईल. पोलंड, युगोस्लाविया, सुदान, कोरिया, फिलिपीन्स, पाकिस्तान, थायलंड, इंडोनेशिया, इस्त्रायल, नायजेरिया अशा थोड्या हटके म्हणता येईल अशा देशांतून हे सगळे जमलेले होते. त्यामुळे बरचसं दुसऱ्या देशांबद्दलही आपल्याला वाचताना कळत जातं. प्रत्येकाच्या वागणूकीमधून तिथल्या संस्कॄतीचा आणि राहाणीमानाचा अंदाज येतो. काहींची वैशिष्टे पण त्यांनी सांगितलेत. सगळ्यात ठळक आणि आपलसं वाटलं ते पाकिस्तानच्या वाकसचं व्यक्तिमत्व. आपल्या सगळ्यांनाच नेहमी पाकिस्तान, तिथली माणसं ह्याची उत्सुकता असते. त्या निमित्ताने ह्यात अनेक गोष्टींचा उलगडा होतो. तिथे इतरवेळी ज्या अनौपचारिक गप्पा होत असत त्यातून अवचटांना, तिथल्या काही लेखकांवर त्यांच्या देशात कसे निर्बंध घातलेले होते ते कळलं. त्याउलट आपल्याकडे एखादा अपवाद सोडल्यास पूर्ण स्वातंत्र्य सगळ्याच बाबतीत असल्याचं दिसतं ज्याचा अभिमान वाटतो.
आयोवा मध्ये असताना दिवसाचे एकांतातले काही तास त्यांनी कसे घालवले ते “आयोवा मुक्काम” ह्यात लिहीलं आहे. आयोवा हे निसर्गरम्य छोट शांत शहर आहे. अतिशय संथ असलेल्या शहराची वैशिष्ट पण खासच आहेत. सगळा परिसर म्हणजे युनिव्हर्सिटीच्या कँपसचा एक भाग आहे. तिथल्या लायब्ररीतली भरपूर पुस्तक जी भारतात असताना वाचायची राहिली होती ती त्यांनी तिथे वाचली, व्हिडीओ सेक्शनमध्ये अनेक पिक्चर्स पाहिले. त्यांचा दिनक्रम नंतर नंतर इतका भरत गेला की सुरवातीला इथे नक्की काय करायचे कसं रहायचे इतके दिवस, असा विचार करणाऱ्या अवचटांना वेळ पुरेनासा झाला. अनेक ठिकाणी फिरले, जितकं पाहता येईल तितकं पाहिलं. अनेकांशी त्यांच्या ओळखी झाल्या, त्यांच्याशी झालेली जवळीक ह्यात त्यांचे दिवस भरगच्च होत गेले. आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते ज्या ज्या कुटुंबात गेले तिथे ते रमले त्यामुळे आयोवातला त्यांचा हा मुक्काम आपल्यालाही थक्क करुन टाकणारा आहे.

ह्या आयोवा प्रोग्राम व्यतिरिक्त ते अनेक शहरात गेले. अगदी “अमेरिकन” म्हणता येईल अशा ज्या विशिष्ठ गोष्टी त्यावेळी त्यांना आपल्यापेक्षा वेगळया जाणवल्या त्या “शॉपिंग”, “कचरा”, “टि.व्ही.” अशा लेखांमध्ये आहेत. शॉपिंग वाचताना वाटतं की ही सगळी संस्कृती तर अगदी जशीच्या तशी आपल्याकडे आली आहे. त्यात आलेला मॉलचा उल्लेख ज्यामुळे रिटेल दुकांनदारांवर झालेला परिणाम, मॉलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्याची रचना, पार्किंगची सोय, अगदी सगळं तसचं. पुढे अगदी तसचं टि.व्हीवरचा लेख वाचताना कळतं की प्रायव्हेट चॅनेल्सवर त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे तशाच प्रोग्राम्सचा भडिमार चालू असतो. न्यूज चॅनेल्सवरच्या तथाकथीत बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि सगळ्यात कहर म्हणजे प्रोग्राम्सच्यामध्ये चालू असणाऱ्या जाहिराती. ह्या सगळ्या गोष्टींचा तसाच अतिरेक आपल्याकडे चालू असतो. उलट आपल्याकडचं त्यांच्या प्रोग्राम्सच भ्रष्ट वर्जन, (अनरिऍलिस्टिक) रिऍलिटी शोज बघवत नाही. तसचं सगळ्यात जास्त कचरा निर्माण करणारा हा देश आहे आणि त्याची विल्हेवाट ते कशी लावतात त्याचं वर्णन “कचरा” ह्या लेखात आहे. प्रत्येक वस्तूला असलेलं पॅकिंग, सतत वापरले जाणारे टिश्यूज, पॅकिंगसाठी लागणाऱ्या ह्या वस्तू बनवण्यासाठी लागणारी केमिकल्स ह्याने होणारे प्रदूषण भयंकर आहे. त्याचाही प्रभाव आपल्या इथे दिसून येतो. ह्या लेखात शेवटी ग्रीन हाउस इफेक्ट, ओझोन होल ह्याचा उल्लेख आहे. तिथे राहून पी.एच.डी करणाऱ्या श्याम आसोलेकरांनी (ज्यांनी अलिकडे ठाण्यामध्ये गणपती विसर्जनासाठी कॄत्रिम तलावांची सुरवात केली) अवचटांना त्याची सविस्तर माहीती दिली होती. त्यात त्यांनी म्हंटलय की दक्षिण ध्रुवाजवळ जसे ओझोनला भोक पडले आहे तसेच उत्तर ध्रुवाजवळ पण पडलयं. ह्या संदर्भात अलीकडेच एक बातमी आली होती. ग्लोबल वॉर्मिंगमुळे “विल्किन्स” नावाचा एक हिमनग कोसळण्याच्या बेतात आहे. आणि गेल्या ५० वर्षात पृथ्वीवरच्या अन्य कोणत्याही ठिकाणापेक्षा उत्तर ध्रुवाकडील या परिसराला सगळ्यात जास्त मोठा फटका बसला आहे. शॉपिंग, टि.व्ही., कचरा ह्या तिन्ही लेखांत त्यांच्या अनुकरणाने आपल्या देशात निर्माण झालेलं आणि पुढे येणारं असं दोन्हीच चित्रण आहे.

“वकील” लेखामध्ये काही मजेदार प्रसंग सांगितले आहेत. तिकडे कोणीही कोणावर अगदी छोट्या गोष्टींसाठीही खटले भरत असतात (ज्याला तिकडे सू करणे म्हणतात.) अगदी एखाद्या मित्रावरसुध्दा! प्रत्येकाची इंश्युरन्स कंपनी हे खटले भरत असते किंवा चालवत असते. बऱ्याच प्रकारचे इंश्युरन्स तिकडे आहेत. पेशंट डॉक्टरवर अनेक प्रकारे खटले भरु शकतो. अलिकडे आपल्याकडेसुध्दा डॉक्टर स्वतःवर केस होऊ नये म्हणून अनेक प्रकारच्या टेस्ट्स करुन घ्यायला लावतात. ज्याचा पेशंटला त्रास होत असतो. आपल्याकडे अशी सोपी केस करण्याची पध्द्त आली तर अनेक डॉक्टरांचे हाल होतील ह्यात शंका नाही, अर्थात त्यात दोन्ही बाजूने धोका होऊ शकतो पण सामान्य माणसांचा त्यात झाला तर फायदाच होईल. ह्या लेखातले एक-एक किस्से वाचताना म्हणूनच आश्चर्य वाटतं.

अमेरिकेत शहरी भागात ज्या समस्या आहेत त्याची गंभीरता “व्यसनं”, “कौटुंबिक” ह्या लेखात मांडली आहे. व्यसनांमध्ये सिगारेटचे दुष्परिणाम तिथे लोकांना व्यवस्थित पटलेले असल्याने त्याबाबत ते जागृक आहेत. दारुच्या व्यसनावर आळा घालण्यासाठी पण प्रयत्न चालू असतात. दारु पिऊन अपघात होऊ नयेत म्हणून तिथे अनेक प्रकारे काळजी घेतली जाते. पण सगळ्यात गंभीर समस्या आहे ती ड्रग्जची. ड्रग्सचे आणि ते घेण्याचे वेगवेगळे प्रकार तिथे उपलब्ध आहेत. ड्रग्ज विक्रेत्यांना आळा घालण्यात सरकार कमी पडतं. त्यासाठी अनेक पळवाटा ह्या ड्रग लॉर्ड्सकडे आहेत. ड्रग्जचे मानसिक, शारिरिक दुष्परिणाम मग कुटुंबावर व्हायला लागतात. मुक्तांगणमध्ये व्यसनमुक्तीसाठी अजून काही करता येईल का? ह्या हेतूने तिथल्या एका सेंटरला अवचटांनी भेट दिली तेव्हा तिथल्या सायकियाट्रिस्टने सांगितलं की तिथे हे ऍडिक्टस मोठ्या प्रमाणावर ऍडमिट होतात पण ट्रिटमेंटच्यावेळी डॉक्टरची फसवणूक करतात ज्यामुळे ते रिलॅप्स होत रहातात. तिथल्या कौटुंबीक समस्या आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत. लग्नाविषयी तिथे वेगळी मत आहेत. त्याला अनुसरुन मग सिंगल पॅरेंट, बॅटर्ड चिल्ड्रेन, चाईल्ड इन्सेंस्ट अशा समस्या तिथे आहेत. ह्या समस्यांचा परिणाम म्हणजे बरिचशी मुलं तिथे ह्या ना त्या कारणाने व्यसनाधिन होत असतात. तिथे एकमेकांबद्दल आपुलकी, स्नेह हा अभावानेच असावा. एकटेपणा हा तिथला स्थायीभाव आहे जो कोणत्याही वयात तिथे आढळतो विशेषतः वॄध्दापकाळात अनेकांना भेडसावणारी ही समस्या आहे. ह्या समस्या म्हणून तिथे अशा एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. अशा समस्यांवर चर्चा होतात, टि.व्हीव्दारे प्रचार केला जातो त्यामुळे बरीच जनजागृती होत असते.

“पोर्टलँड”, “रेडवूड-ग्रँड कॅनियन”, “लास व्हेगास” ह्या लेखांमध्ये त्यांच्या वैशिष्टपूर्ण शैलीत त्यांनी ह्या ठिकाणची वर्णनं केली आहेत. कलासक्त अशा मांडणीशी निगडीत असलेलं पोर्टलँड, रेडवूडच्या जंगलातल्या झाडांची माहिती आणि ग्रँड कॅनियनच वर्णन ह्याचा वाचूनच आनंद घ्यायला हवा इतकं ते वाचताना डोळ्यासमोर येत जात. लास व्हेगासमध्ये अगदी उलट म्हणजे सगळं मानवनिर्मित मनोरंजनच तिथे होतं त्यामुळे काही वेळानंतर त्या कृत्रिमतेचा त्यांना वीट आला ह्यात आपल्याला आश्चर्य वाटत नाही.

इथून जाताना ओळखीच्यांचे फोन नंबर, पत्ते अवचटांनी नेले होते. ज्यात त्यांचे स्नेही प्रा. वसंत देशपांडे उर्फ व्हि.डी ह्यांची एक मैत्रीण सँड्राचा पण होता. “सँड्रा” ह्या वेगळ्या लेखात तिच व्यक्तिमत्व आणि कौटुंबिक जीवनाचं चित्रण केलेलं आहे. तिच्या मदतीने त्यांना मेक्सिकोलाही जाता आलं होतं. मेक्सिकन मजुरांवरील वाचनामुळे त्यांना इथून जातानाच मेक्सिकोबद्दल आकर्षण होते. आपल्याकडच्या उसतोडणी कामगारांसाठी त्याचा काही फायदा होऊ शकेल म्हणूनही उत्सुकता होती. मेक्सिकोपर्यंत जातानाचा प्रवास, तिथली माणसं, त्यांच दारिद्रय, आतमधला परिसर, आजुबाजूचं वर्णन जे बरचस भारतातही अनेक ठिकाणांशी साम्य असलेलं आहे जे ह्या “मेक्सिको” लेखात आहे. आपल्या इथल्या उसतोडणी कामगारांच्या समस्येसारखी असलेली एक समस्या म्हणजे मेक्सिकन मजूरांचे अमेरिकेच्या पूर्वेला स्थलांतर होणं. शेतीची काम करणारे मजूर जे मुख्यतः मेक्सिकन आहेत अशांच्या समस्या “स्थलांतरीत” मध्ये आहेत. हे मजूर कमी पैशात, कमी सोयी असलेल्या ठिकाणी राहून आपली उपजिविका करत रहातात. स्थलांतरीतांना तिथे तुच्छ वागणूक मिळत असते. त्यांना सीझर शॅवेझ सारखा नेता लाभला ज्याने फक्त मेक्सिकनच नव्हे तर फिलोपिनो, चायनीज व अमेरिकन ब्लॅक्स अशा मजुरांना एकत्रित करून संघटना बांधली.
इथून तिकडे जाणारे भारतीय ज्यात गुजराथी लोकांचा भरणा आहे. तिथे त्यांनी अमेरिकन व्हिसा, ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी केलेल्या करामती “भारतीय” लेखात सुरुवातीला सांगितल्या आहेत. शिवाय भारतीयांच तिथे असलेलं स्थान, त्यांचे काम-धंदे, त्यांच्या मुलांची असलेली द्विधा मनस्थिती ह्याबद्दलचे विचार मांडले आहेत. एकूणच भारतीयांची तिथली जीवनपद्घती आहे. तिथे जन्माला आलेल्या पिढीचे विचार, त्यांना पडलेले प्रश्न आपल्याला निरुत्तर करतात. अमेरिकेला मेल्टिंग पॉट म्हंटल जातं. अमेरिकेमध्ये राहून कष्ट, कर्तबगारिने माणूस श्रीमंत होऊ शकतो. पण असं असलं तरी तिथे माणसामाणसात अनेक प्रकारे भेदभाव केले जातात. त्याची अनेक उदाहरण “मेल्टिंग पॉटमध्ये” त्यांनी सांगितली आहेत. अमेरिकेचा इतिहास आणि तिथे गेले असतानाचा वर्तमान ह्याची माहिती आपल्याला कळते. अमेरिकन माणसांची मानसिकता कशी आहे हेही प्रकर्षाने कळतं. “रेड इंडियन्स” वरच्या लेखात तिथली परंपरा, संस्कॄती सांगितली आहे. टूरिस्ट लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यात कसा कृत्रिमपणा आणला होता हे त्यात सांगितलं आहे.

सगळ्यात शेवटी त्यांना अमेरिका कशी वाटली हे “चार शब्द” मध्ये सांगितल आहे. हे पुस्तक आल्यानंतर जवळजवळ दीड वर्षांनंतर लिहिलेलं असून प्रत्येक गोष्ट त्यांनी त्यावेळी नुकतीच घडल्यासारखी लिहिली आहे. तिकडे गेल्यानंतर जे काही पाहिलं त्याचा दोन्ही बाजूने त्यांनी विचार केलेला आहे. त्यांच अनुकरण आपण करतच असतो. ह्या लेखात त्यांनी जे म्हंटल आहे की आपल्याकडे पुढे ज्या समस्या निर्माण होतील त्या त्यांना अमेरिका पाहताना दिसल्या ज्या आता प्रत्यक्षात आपण अनुभवतो पण आहोत. तिथला कॄत्रिमपणा बराचशा ठिकाणी आता इथेही दिसतो.

अमेरिकेत जरी समस्या असल्या तरी सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यावर उपाय पण केले जातात. लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळतो त्यामुळे लोकांमध्ये जागरुकता आहे. हे पुस्तक बरचं आधी लिहिलेलं आहे त्यामुळे अनेक बदल सगळीकडे झाले आहेत. अमेरिकेमध्ये इतर अनेक देशांतले लोक रहिवासी म्हणून आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यानंतर तिथे अनेक बदल झाल्याचे आपण वाचतो. तिथल्या नागरिकांचा जगाकडे विशेषतः तिथे रहाणाऱ्या एशियन्सकडे बघण्याच्या दॄष्टिकोनात फरक पडला आहे. अमेरिकेचा इतर देशांबद्दल असलेला आकस, दुस्वास नेहमीच आपल्याला दिसून येतो. पण लोकांना सार्वजनिक भान, शिस्तदेखील आहे. ह्या पुस्तकातून मला जशी अमेरिका दिसली तशीच सगळ्यांना दिसली असेल असे नाही जे तिथे रहात आहेत किंवा जाऊन आले आहेत त्यांना काही वेगळही ह्या पुस्तकातून सापडेल. भरपूर किस्से, प्रसंग, अनुभव ह्यांनी हे पुस्तक मनोरंजक झाले आहे. प्रत्येकाने विशेषतः तिथे रहाणाऱ्या भारतीयांनी नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे.


अमेरिका : रुपाली महाजन

February 17, 2008

पुस्तक रसग्रहण : छंदाविषयी (रामेश्वर महाले)

Filed under: Books — Manish @ 4:09 pm

chhandavishayi1.jpgआपल्या मुलाकडे बोट दाखऊन एक शिक्षक असलेला माणूस म्हणाला ,”हा चित्र चांगलं काढतो म्हणून चित्रकलेच्या क्लासला घालावं म्हणतो;पण पुढे त्याचा काय फायदा ?”
शिक्षक असलेल्या माणसाने असं विचारावर काय उत्तर देणार ?

एखादा छंद माणसाला नक्की काय देतो ? हा खरंच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे.

या प्रश्नाचं नेमकं उत्तर नाही देता येणार;पण एका माणसाला दहा-बारा वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतील तर………

तर माझ्या शिक्षक मित्राला मी अनिल अवचट यांचं ‘छंदाविषयी’ हे पुस्तक वाचायला देईल.

चित्रकला,स्वयंपाक,ओरिगामी,फोटोग्राफी,लाकडतील शिल्पं,बासरी,वाचन आणि अजुन कितीतरी छंदांविषयी माहिती देणारे हे पुस्तक वाचनीय आणि छन्दिष्टानसठी अनुकरणीय आहे. “एखाद्या नव्या गोष्टीकडे लक्ष वेधले जाते आणि आपण त्याच्या मागे लागतो,तो शिकण्याचा काळ मला फार रम्य वाटतो.आपली बोटे हळूहळू वळू लागतात,डोकं त्या दिशेने चालून पकड घेऊ लागते आणि आपल्याही हातातून किंवा गळ्यातून ती नवी गोष्ट उमटू लागते.मग त्याचे वेड लागते. तीच गोष्ट अनेकदा करू लागतो.नंतर ती दुसर्‍याला देऊ लागतो.प्रत्येक पायरीचा आनंद वेगवेगळा असतो.” अशा शब्दांत प्रस्तावनेतच आपली भूमिका लेखक स्पष्ट करतात.

चित्रकलेचं वेड अवचटना लहानपणापासूनच असल्याचं स्पष्ट होतं. त्यांचा चित्रकलेवरचा लेख म्हणजे मनोहर नावाच्या चित्रकार मित्राची गोष्ट आहे. आपल्या ओघवत्या शैलीत लेखक चित्रकलेचा विकास कसा कसा होत गेला, मनोहारकडून चित्र ‘बघायला’ कसं शिकले हे सांगतात. लहानपणी पाटीवर काढत असलेल्या शिवाजी पासून ओइल पेनटिंग्ज आणि हल्ली छोट्या कार्डावर काळ्या पेनने काढलेली चित्र हा प्रवास मुळातूनच वाचण्यासारखा आहे.

या लेखात त्यांनी कॉलेजात असताना पुतळा बनवल्याची गोष्ट सांगतात आणि लाकडातून शिल्प बनवण्याची प्रेरणा कशी मिळाली हे कळते. स्वयंपाक करायला लेखक गारजेपुरता शिकले तरी नंतर त्या प्रांतात ते कसे शिरत गेले;कोणा कोणा कडून काय काय शिकत गेले हे इतक्या सुरेखपणे सांगतात की असं वाटावं -अवचट भाजी चिरता चिरता काही टिप्स देताहेत आणि आपण समोर बसून ऐकतोय. स्वयंपाक ही सुद्धा एक कला आहे आणि पुरूष मंडळीही त्यात कसे पारंगत होत जातात हे जरूर वाचायला हवं.
एका मित्राच्या जपानी पेनफ्रेंड्ने कागदाचा पक्षी पाठवला आणि एका नव्या कागदी जगाची ओळख झालीं हे अजबच वाटतं. अतिशय चिकटीने पाठपुरावा करत त्यांनी ही कला आत्मसात केली आहे.प्रवासात,एखाद्या कार्यक्रमात,अगदी सिनेमा बघतांनाही ते ओरिगामी करतात-अशी ही चौकोनी कागद घेऊन करता येण्यासारखी कला. याचप्रमाणे लेखक आपल्या फोलोग्राफी,बासरी,वाचन या छांदांची गोष्ट सांगतात. लेखक असूनही आपलं वाचन कसं मर्यादित होतं हेही ते सहजपणे सांगून टाकतात.

‘इतर छंद’ या शेवटच्या लेखात दोरिचे खेळ,जादू,बाजा असे एक एक छंद सांगत जातात आणि हा म्हणजे एकदम खल्लास माणूस आहे याची खात्रीच पटते. आपल्या छांदांविषयी सांगत असतांना लेखक आजूबाजूच्या लोकांच्या कॉमेन्टसचा उल्लेख करत जातात आणि ते वाचतांना मजा येते-विशेषता: मुक्ता आणि यशोदा लक्षात राहतात त्या यामुळेच.या आपल्या मुलींनाच त्यांनी पुस्तक अर्पण केलंय;तसेच पुस्तकाचा चौकोनी आकार आणि मुखप्रुष्ठ्ही लक्षात राहतं.आतील काही पानांवर छापलेली चित्र ,ओरिगमीचे फोटो,लाकडतील शिल्पांचे फोटो अशांमुळे पुस्तक आपोआपच संग्रही (आणि थोडे महागही!) झाले आहे.

अतिशय साध्या-सोप्या भाषेत लिहिलेले हे लेख वाचणार्‍या प्रत्येकाला नक्कीच काहीतरी छंद जोपासायला लावतील यात शंका नाही.


छंदाविषयी : रामेश्वर महाले

January 5, 2008

पुस्तक रसग्रहण : वेध (यशोदा वाकणकर)

Filed under: Books — Manish @ 4:50 pm

Vedhवेध: बाबाचं मला सगळ्यात आवडणारं पुस्तक म्हणजे वेध! हे त्याचं पहिलं वहिलं आणि आतून आलेलं लिखाण. त्याच्या गद्धेपंचविशीत पोटतिडकीनं लिहिलेले लेख. आपल्या लिहिण्यानी कुणाला काय वाटेल याचं अजिबात ओझं न घेता बेधडकपणे लिहिलेलं. आणि त्यामुळेच मनाला भिडणारं.

लोकमान्य नगर मधे शेजारी रहाणारे ‘सकाळ’चे जेष्ठ पत्रकार मो. स. साठे ह्यांनी बाबाला लिहायला प्रोत्साहन दिलं. ‘जसं सांगतोस तसं लिहायचं’ असं सांगितलं. सुरवातीला काहींनी बाबाच्या लिखाणावर ‘शैली नसलेली शैली’ अशी टिपण्णी केली; पण हळूहळू ती ‘अनिल अवचट’ शैली बनून गेली. आणि त्या ‘जणू-वाटे-गमे-भासे’च्या काळात ती शैली जास्तच उठून दिसली. तेव्हाचे बोली भाषेतले काही इंग्रजी शब्द वेधमधे सरळ देवनागरीत लिहिले आहेत. आता ती पद्धत रुळून गेली आहे, पण तेव्हा ते नवे होते.

१९६७-६८ च्या सुमारास पु.लंच्या पुढाकारानी पुण्यात बालगंधर्व रंगमंदीर बांधलं गेलं. तेव्हा तिथली उठवलेली मांगांची वस्ती, त्यांना न दिलेली पर्यायी जागा, बांधकामासाठी केलेला खर्च, ह्या सगळ्याच्या विरोधात बाबानी साधना साप्ताहिकात छापण्यासाठी संपादक यदुनाथ थत्ते यांना एक पत्र नेऊन दिलं. ते छापून आलं.

त्याच विषयावर अजून लिहावसं वाटलं म्हणून बाबानी अजून एक पत्र लिहिलं. ते तर छापून आलच; शिवाय यदुनाथ थत्ते यांनी बाबाला दर आठवड्यात लिहायला सांगितलं, आणि वेध ची मालिका तयार झाली. ह्या मालिकेत अनेक मान्यवर व्यक्तींवर किंवा स्वत:ला उच्चभ्रू समजणा-या व्यक्तींवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तिरकसपणे लिहिलेलं दिसतं. पण ते जसं दिसलं तसं लिहिलेलं असल्यामुळे त्यावर कुणी टिकाही करू शकलं नाही. उलट आज ते वाचताना हसूच येतं. असं वटतं की हे विचार अनेकांच्या मनात येत असतील, पण ते इतके बेधडकपणे कागदावर उतरत नसतील. त्यामुळे अनेकांना ते आपलेसे वटतात. शिवाय बाबाच्या भाषेतल्या तिरकसतेबरोबर त्याच्या मनातली अस्वस्थता, एक तरुणाई, शोधक व्रुत्ती, कुतुहल, सरळ स्वभाव अशा अनेक गोष्टी दिसून येतात. आणि इतक्या छोट्या छोट्या लेखांमधूनही त्यातल्या मर्मीक भाषेमुळे आपल्याला खूपसा तपशील कळतो.

वेध मधला एक लेख क्रिकेट विषयी आहे. क्रिकेटचं सर्व वयोगटातल्या माणसांना असलेलं वेड, मॅच असल्यावर कामधाम सोडून ऐकलेली कॉमेंट्री, अशावेळी इतर बातम्यांकडे झालेलं दुर्लक्ष इत्यादी. तसच भारतीय खेळ कसे मागे पडत आहेत हे ही त्यात लिहिलं आहे. हा लेख अकरावीच्या मराठीच्या पुस्तकात एक धडा म्हणून निवडला होता, तेव्हा सगळे विध्यार्थी ह्या धड्यावर खूपच खार खाऊन असायचे! फ़क्त विध्यार्थीच नाही, तर शिक्षकही! क्रिकेट बद्दलचा विरोध त्यांना पचायचा नाही. बाबाला जेव्हा जेव्हा कुठल्याही कॉलेज मधे भाषणासाठी बोलवायचे, तेव्हा मुलं ह्याच विषयी त्याला प्रश्न विचारायचे. आज हा विचार करताना हसू येतं. आता तर टेस्ट मॅच वरून वन-डे, वन-डे नंतर २०-२०, त्यातही राजकारणी मणसे, सामील असलेले नेते, मॅच फ़िक्सींग अशी क्रिकेटची उत्क्रांती झालेली आहे!

वेध पुस्तक लिहून आता ३८ वर्ष झाली, तरी काही गोष्टी अजून तशाच दिसतात. आपल्याला वाटतं की भारतातलं कॉम्प्युटरचं आगमन, आय.टी. ची सुरवात आणि त्यातली प्रगती, इतर यशस्वी उद्योग, सहज परदेशी शिक्षण आणि लोकांचे भरपूर पैसे कमावणे ह्यामुळे आपल्या देशाची केवढी भरभराट झाली आहे! मान्य आहे, भरभराट आहे, पण पूर्वीचेच प्रॉब्लेम्स, पूर्वीच्याच मनोव्रुत्ती आता वेगळ्या तर्‍हेने पुढे येत आहेत.

त्यावेळी भरलेल्या देशस्थ ब्राम्हणांच्या सम्मेलनाविषयी, सी.के.पीं च्या सम्मेलनाविषयी सडकून टिका करणारे लेख ह्या पुस्तकात आहेत. त्यावर बाबानी झकास विनोदी अंगाने सुद्धा लिहिले आहे. पण आता तर सगळ्या पोटजातींचीही सम्मेलने भरतात. नुकतच पुण्यात झालेलं चित्पावन महासम्मेलन हे त्याचं ठळक उदाहरण. ‘आले रे आले, कोब्रा आले’ अशा घोषणा देत जाणारे कोकणस्थ, आणि ‘जगात फ़क्त दोन जाती आहेत; एक कोकणस्थ आणि उरलेले बाकी सगळे’ हे चर्चा करतानाचं ब्रीदवाक्य, आणि सम्मेलनात एक लाख कोकणस्थांची उपस्थिती ही प्रगती म्हणायची की अधोगती?

गणेशोत्सवात आणि साहित्य सम्मेलनात शिरू पहाणारे राजकारण या विषयी वेध मधे लेख आहेत. आजच्या युगात तर राजकारणाशिवाय ह्या उत्सव-सम्मेलनांची पाने हलत नाहीत! शिवाय त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवद्णुका झाल्या, की ‘नेमेची येतो पावसाळा’ प्रमाणे येणारे टिकात्मक लेख!

वेध मधे काही लेखांमधे विनोदाची झालरही दिसते. एक सत्याग्रहाविषयीचा लेख आहे. त्यात तेव्हा घडणारे अनेक विनोदी – जे एरवी गंभीर असायला पाहिजेत, असे प्रसंग आहेत. आणि ते लिहायला सुचणं हे मुख्य.जसे की – “सत्याग्रहाच्या वेळी बाजूने एक एल. आय.बी. चा सध्या वेषातला शिपाई चालला होता. त्याने थांबवले. ‘का हो डॉक्टरसाहेब, ह्या सगळ्या गडीमाणसांसाठी हे पोलीस आणले, बायकांसाठी खास स्त्री-पोलीस आणले’ -आणि मग थांबून काही स्त्री-वेषातल्या हिजड्यांकडे बोट दाखवून व गालातल्या गालात हसून म्हणाला, ‘पण यांची व्यवस्था काय?’ आम्हीही हसलो. कोणाचे काय अन कोणाचे काय. लोकांच्यापुढे राहायच्या झोपड्यांचा प्रश्न,पुढार्‍यांपुढे त्यांचे किंवा त्यांच्या पुढारीपणाचे प्रश्न, कमिशनरांच्या पुढे या सगळ्या झोपड्यांची कटकट कशी घालवावी हा प्रश्न. तर एल. आय.बी वाल्यांपुढे या हिजड्यांचे काय करायचे हा प्रश्न!
आमच्यापुढे, आपण दुपारपासून इकडेच असल्याने आपण चहाच घेतला नाही हा प्रश्न उभा राहिला, आणि त्या दिशेने वळलो.”

वेध मधले काही लेख वाचताना, ‘तो काळ आता गेला’ असही मनात येतं. भारतात अजूनही गरीबी असली, दारिद्र्यरेषेखालचा समाज असला तरी मध्यमवर्गीयांची परिस्थिती सुधारलेली दिसते. मध्यमवर्गीयांचे आता उच्च्य-मध्यमवर्गीय झाले आहेत. ड्रायव्हर, कामवाल्या बायका, रंगारी, भाजीवाले यांच्याकडेही आता मोबाईल, टी व्ही, फ़्रीज, ह्या गोष्टी असतात. त्याच प्रमाणे शिक्षणातली सजगता दिसते. इंटरनेटमुळे तर्‍हतर्‍हेची माहिती आपल्या पर्यन्त पोचते.

तेव्हा लिहिलेल्या ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे’ स्वरूप आता बदलले आहे. पूर्वीपेक्षा सुधारणा आहे, पण आता झालेल्या त्यच्या ‘अति व्यावसायीक’ आणि पुणेरी स्वरूपावर एक वेगळा लेखच होईल!!

हे सगळं असलं तरी वेध मनाला भिडतं ते भिडतच!! आता फ़क्त बाबाला एवढच सांगावसं वाटतं, की ‘वेध भाग-२’ लिहायची वेळ आली आहे!!!


वेध : यशोदा वाकणकर

Next Page »

Blog at WordPress.com.