Anil Awachat (अनिल अवचट)

August 31, 2007

पुस्तक रसग्रहण : स्वतःविषयी

Filed under: Books — Manish @ 1:18 pm
Tags: , , , ,

Swatahvishayi by Anil Awachat स्वतःविषयी हे अनिल अवचट ह्यांच्या आत्मपर लेखांचे पुस्तक, पण हे आत्मचरित्र नाही. लेखकाच्याच शब्दात – “माझ्या परीने मी पूर्वायुष्यात बुडी मारून काही अनुभव किंवा दृष्टी घेऊन बाहेर येत होतो…”

पुस्तकातील ५ प्रकरणात (खरेतर दीर्घ लेखांत) लेखकाच्या आयुष्यातील महत्वाचे कालखंड/टप्पे उलगडतात.

  • दहावीचं वर्ष
  • डॉक्टरी
  • मुक्काम नानापेठ
  • धार्मिक
  • संगोपन

ह्या पुस्तकाची प्रस्तावनाही सुरेख झाली आहे. लेखकाचा प्रांजळपणा, संवेदनशीलता आणि अंर्त:मुख दृष्टी जाणवत राहते. लेखकाने प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे – ‘ह्या लिखाणने मी अधिक समंजस झालो’. हा समंजसपणा, सहिष्णुता, सौंम्यता नवीन लिखाणात प्रकर्षाने जाणवते – विषेशत: जुन्या वेध वगैरे पुस्तकांच्या तुलनेत.

दहावीचं वर्ष हा शालेय जीवनातील आठवणींचा लेख. ओतुर सारख्या लहान गावातुन पुण्यातल्या शाळेतला प्रवेश, त्यातील अडचणी, स्वतःविषयीचा न्यूनगंड, होस्टेलमधील वेगवेगळे अनुभव, स्वतःचे भरकटणे ह्याविषयी अनिल अवचट यांनी मोकळेपणाने लिहिले आहे. लेख/पुस्तक लिहितांना, ‘वडिलांना परवडत नसतांनाही, उत्तम शिक्षण मिळावे म्हणून पुण्याला महाग वसतिगृहात आणि मी मात्र तेथे पुरा बहकलो’ अशी कबुलीही देतात.

डॉक्टरी हा पुस्तकातील सर्वात प्रदीर्घ लेख आणि अनिल अवचट ह्यांच्या जीवनातील महत्वाचा कालखंड. अनेक अर्थांनी turning point म्हणता येईल असा. ह्या कालखंडाविषयी ते सविस्तर लिहितात. ह्याच दिवसांत त्यांच्या पुढिल आयुष्यावर प्रभाव टाकणा‍‌‍र्‍या अनेक घटना घडल्या. ह्याच दिवसांत ते कुमार सप्तर्षी ह्यांच्या प्रभावात आले, विविध सामजिक चळवळींमध्ये सामील झाले. ह्याच दिवसांत ते विविध अभ्यासेतर उपक्रमात सहभागी झाले. ह्या काळात त्यांनी चित्रे काढली, शिल्पं बनवली, नाटकाचे सेट, गणपतीची आरास केली, शास्त्रीय संगीत ऐकले – त्यांच्या कित्येक कलागुणांना ह्याच काळात व्यासपीठ मिळाले आणि प्रोत्साहनही! ह्याशिवाय ह्याच दिवसांत त्यांनी आंदोलने केली, रक्तदान शिबिरे घेतली, बिहारमधे टीमबरोबर अन्नकेंद्र, दवाखाना चालवला. ह्या सर्व उद्योगांमधे त्यांचा डॉक्टरीचा उत्साह मावळत होता. ईंटर्नशिप तर चांगलीच रखडली. डॉक्टरीमधे साहजिकच त्यावेळेचे डॉक्टर प्रोफेसर, त्यांचे शिकवणे, त्यांच्या लकबी, बरे-वाईट अनुभव हे देखिल लिहिले आहेत.

त्यांची पत्नी सुनंदा ह्यांची ओळखही डॉक्टरीच्या वेळेसची. त्या दोघांच्या लग्नाआधीच्या दिवसांविषयी, एकत्र सहजीवनाविषयी ह्या पुस्तकात (आणि इतर पुस्तकातही) कित्येक उल्लेख आहेत. त्या दोघांची मैत्री, नाते, सुसंवाद, सांमजस्य, sharing हा अतिशय लोभस भाग आहे. डॉक्टरी ह्या प्रकरणात स्वत:च्या उद्योगांविषयी अनिल अवचट लिहितात –

सुनंदा म्हणायची, “तुला हेच करावंसं वाटतं ना? आयुष्यभर हेच कर. मी पैसे मिळवीन. माझी प्रॅक्टिस जोरात चालेल, असा मला अगदी कॉन्फिडन्स आहे. तुला स्टुडिओला जागा घेऊ. तिथं तू हे सगळे उद्योग करीत बस.”

अर्थातच वीस-बावीसाव्या वर्षी हे romantically म्हणणे वेगळे आणि आयुष्यभर realistically निभावणे वेगळे. सुनंदा अवचट ह्यांनी हे ‘role reversal’ आणि अनिल अवचट ह्यांचा विविध क्षेत्रातील संचार, experimentation, त्यांची अनिश्चितता, चढ-उतार आणि मुलुखावेगळी जीवनशैली अतिशय समर्थपणे हाताळली. अनिल अवचट ह्यांच्या विविध क्षेत्रातील यशात सुनंदा अवचट ह्यांच्या निश्चयी, भक्कम पाठिंब्याचा आणि प्रोत्साहनाचा फार मोठा वाटा आहे. किंबहुना मुक्तांगण सारख्या उपक्रमाचे यश सुनंदा अवचट ह्यांच्या प्रयत्नांचेच आहे. अर्थातच अनिल अवचट हे श्रेय आनंदाने त्यांना देतात.

मुक्काम नानापेठ हा त्यांच्या लग्नानंतरचा ८-९ महिन्यांचा खडतर काळ. त्यांच्याच शब्दात, ‘सगळा तुटलेपणाचाच तो काळ होता.’ लोकमान्य नगरातील पांढरपेशा, मध्यमवर्गीय वस्तीतून नानापेठेतील बकाल खोलीतील मुक्काम हा प्रवास कठिणच. तो काळ अनिल अवचट ह्यांनी सहजपणे, पारदर्शीपणे शब्दांमधे चित्रीत केला आहे. वाचतांना वाचकाच्या डोळ्यासमोर चित्र उभी करणारी त्यांची शैली असाधारणच आहे. त्यांच्या चाळीतील १०x१२ खोलीतील नव्या संसाराचे वर्णन कधी मजेशीर तर कधी अंगावर काटा आणते. आपण गृहितच धरतो असा साधा चमचा, चिमटा ह्यांची खरेदीसुद्धा किती आनंद देऊ शकते? पुस्तकातील – ‘चिमटा आणला तेव्हा मी ऐटीत दुधाचं पातेलं उचलून सुनंदाला खोलीभर फिरवून दाखवल. तिनं जेव्हा टाळ्या वाजवल्या तेव्हा मी सर्कसमधले खेळाडू मान झुकवून टाळ्या स्वीकारतात तसं ऍक्टिंग केलं.’ हे वाचून हलकेच (“how cute!” style चं) एक स्मित उमटते. आपण सगळ्या सुखसुविधा असतांनाही (कि असल्यामुळेच?) असे छोटे, उस्फुर्त आनंद गमावले आहेत का असे वाटते!

ह्याच काळातील पैशाची ओढाताण, त्यांच्यातील छोटीमोठी भांडणे, त्यांतले ‘पॅटर्न’, त्यांचा सुनंदाच्या PMS शी असलेला संबंध — त्यानंतर अनिल अवचटांचा त्या काळातील समजुतदारपणा हे वाचून भरून येते. एक नवरा म्हणून त्यांनी दिलेली साथ दाद द्यावी अशीच आहे.

ह्याच मुक्कामात त्यांची बाबा आढावांशी ओळख वाढली. त्यांच्या मैत्रीविषयी, हमालांच्या दवाखान्याविषयी, हमालांच्या हलाखीच्या जीवनाविषयी या लेखात लिहीले आहे. सुनंदा अवचट ह्यांची मुक्ताच्या वेळेसची प्रेग्नसीही ह्याच काळातील. त्या आठवणी, तसेच abortion चा अनुभव, दुरावलेली नाती हे वाचून अंगावर काटा येतो. इतक्या प्रतिकुल परिस्थीतही त्यांनी कडवटपणा येऊ न देता, एकमेकांना दोष न देता स्वीकारलेली वेगळी वाट व जीवनशैली खरच कौतुकास्पद आहे.

धार्मिक हा लेख/प्रकरण एका विशिष्ट काळाविषयी नाही – पण अनिल अवचट ह्यांच्या आयुष्यावर परीणाम करणार्‍या विविध धार्मिक व्यक्ती, धार्मिक संस्कार, कर्मकांड, चालीरिती ह्यांच्याविषयी आहे. लहानपणी अपराधीपणातून आलेली धार्मिकता, भजन-कीर्तन, घरातील धार्मिक वातावरणाचा प्रभाव ह्यापासुन ते तारुण्यातील पूर्णानंद स्वामींचा सहवासातील विविध अनुभव ह्यांचे विश्लेषण मनोवेधक आहे. सामाजिक कार्यातुन आलेला धार्मिक दंगलींचा, धर्माधारीत शोषणाचा अनुभव यांनी त्यांची मते बदललीत, तरिही धर्म हा व्यक्तिगत जीवनातील अनेक गरजा भागवतो असेही त्यांना वाटते.

अनिल अवचट लिहितात – ‘धर्म-जातींनी ग्रस्त असलेल्या या समाजाचं मन आपल्याला समजावं असं वाटतं. यासाठी ते आहे तसं पाहायला शिकलं पाहिजे.’ तरिही ते स्वतः काही वेळेस communist-socialist आणि slightly prejudiced दृष्टीकोनातून पाहातात असे वाटते. (‘मुंज’ ह्या ‘जगण्यातील काही’ पुस्तकातील लेखातही हे प्रकर्षाने जाणवते).

हा लेख व्यक्तिशः मला ह्या पुस्तकात थोडा अप्रस्तुत वाटला. पण लेखकाच्या जडणघडणीत ह्या संस्कारांचा, अनुभवांचा महत्वाचा वाटा आहे, आणि त्यांची agnostic ही भुमिका समजावुन घेण्यास मदत होते.

संगोपन हा पुस्तकातील सर्वात हृद्य भाग आणि मला सर्वात भावलेला लेख. अनिल अवचट व सुनंदा यांनी त्यांच्या दोन मुलींना (मुक्ता आणि यशोदा) कसे वाढवले ह्याबद्दल लिहिले आहे. त्या दोघांचे strong tuning आणि sharing ह्या संगोपनात जाणवते. ते दोघेही मुलींच्या संगोपनात, शिक्षणात डोळसपणे सहभागी होते. त्या दोघांच्याही वेगळ्या विचारसरणीचा, सामाजिक कार्याचा, वेगळ्या जीवनशैलीचा प्रभाव स्वाभाविकच त्याच्या मुलींवरही झाला. ते सगळंच संगोपन/parenting अतिशय friendly, involved आणि non-authoritative आहे. आणि हे लिखाणातच नाही, तर त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावरही जाणवते. कित्येक वडिलांना मुला-मुलींच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींची नावेही माहित नसतात आणि इथे अनिल अवचटांना मुलींच्या बाहुल्यांचीही नावे आठवतात. ह्या लेखातील ‘चिखलाने सारवलेली स्कूटर’, ‘यशोने तोडलेली चष्म्याची फ्रेम’ ह्या घटनांतून त्यांच्या वागण्यातला वेगळेपणा, मोकळेपणा आणि मित्रत्वाचे नाते लक्षात येते. कित्येक घरात वडिलांनी अशा वेळेस मुलांना चांगलाच ‘हिसका’ दाखवला असता. ‘वडिलांबद्दल ‘आदर’ वाटणे’ ह्यात प्रेमापेक्षा धाक/भीती ह्यांचाच भाग जास्त असतो. अनिल अवचट ह्यांच्या संगोपनात मात्र त्यांचे प्रेम, जिव्हाळा आणि मुलींशी असलेले घट्ट नातेही जाणवते. ते मुलींविषयी लिहितात, ‘त्यांनी मला जास्तीत जास्त आपल्यांतला समजावं अशी माझी धडपड असायची.’ ह्या प्रयत्नात ते १००% यशस्वी झाले हे दिसतेच!

त्यांच्या मुलींबाबतच्या निर्णयात त्यांची सामाजिक जाणीव, वैचारीक दृष्टी, मुलींना आपल्या संस्कृतीचा परिचय व्हावा हा विचार हे सगळंच जाणवते. दोघेही स्वत: डॉक्टर असुनही मुलींना म्युनिसिपल शाळेत घातले. त्यांच्या लिहिण्यात त्यांनी मुलांच्या शिक्षणाविषयी वाचलेली राममनोहर लोहिया, Evan Illich चे De-schooling Society सारखी पुस्तकेही येतात. वाटते, किती पालक मुलांच्या शिक्षणाविषयी असा मुळातून विचार करत असतील? फक्त महागड्या शाळा म्हणजे चांगल्या शाळा नाहीत हे त्यांना कळेल का? Public school वाढते प्रस्थ आणि त्यांना देणग्या देणारे पालक बघितले की हे फार जाणवते. अनिल व सुनंदा अवचट ह्यांची मुलांच्या शिक्षणाविषयीची दृष्टी, मुलांच्या शिक्षणातला त्यांचा सहभाग ह्यातून खूप काही घेता येण्यासारखे आहे.

त्यांचा सहभाग फक्त विचारांपुरताच नव्हता, जेव्हा मुक्ताला बालवाडीत जायचे होते आणि घराजवळ दुसरी बालवाडी नव्हती (एका बालवाडीत बाईंनी तिच्या डावखुरेपणावर टीका केली) तेव्हा त्यांनी घरातच बालवाडी सुरू केली. वाचतांना लक्षात येते की त्या बालवाडीत किंवा पुढे म्युनिसिपल शाळेत शिकतांना संस्कार केवळ त्यांच्या मुलींवरच नाही तर बरोबरीने त्यांच्या मित्र-मैत्रीणींवरही झाले. त्यांच्या घरात काम करणार्‍या प्लेमिना, लक्षी ह्याच्यांबरोबरचे त्यांचे जिव्हाळ्याचे नाते, प्लेमिनाने स्कूटरवरून पडतांना स्वत:ची पर्वा न करता मुक्तीला वाचवले तो प्रसंग हे सगळेच मनात घर करून राहतात. तसाच अंगावर काटा आणणारी घटना म्हणजे मुक्ताच्या जन्मानंतर अनिल अवचट ह्यांना एका आंदोलनात झालेली अटक. सुनंदा अवचट ह्यांचे नुकतेच सिझेरियन झालेले होते आणि अनिल अवचट ८-१० दिवस तुरूंगात. वाटते, कसे काढ्ले असतील ते दिवस त्यांनी? त्याहून महत्वाचे म्हणजे किती समजुतदारपणे हाताळला हा प्रसंग त्यांनी? खूपवेळा वाटते – सुनंदा अवचट हया psychiatrist असल्यामुळे त्यांच्या नात्यांना एक वेगळीच खोली आणि प्रगल्भता होती — आणि बर्‍याच conflicting situations त्यांनी समंजसपणे हाताळल्या.

अनिल अवचट लिहितात, ‘पण (मी) जसा चळवळीत ओढला गेलो तसा संसारातही नकळत गुंतत चाललो होतो’. आणि त्यांचे हे गुंतणे ह्या लेखात अतिशय लोभसपणे जाणवत राहते – मग तो येरवड्याच्या घरातील मुक्तीचा पाळणा असो, तिला ढेकर येईपर्यंत थोपटणं असो की पत्रकारनगरमधील घराचे ‘मुलांसाठी सोयीचे’ design असो. ह्या सगळ्यांमधे अनिल अवचट ह्यांच्यातील प्रेमळ, मुलींच्या संगोपनात सक्रीयपणे सहभागी झालेला आणि गुंतलेला पिता हे रूप फारच भावते!

त्यांनीच म्हणल्याप्रमाणे, ‘आता मी इतका बाप झालोय की बाप नसतांना मी कसा होतो ते आठवतही नाही. एकेकाळी आपल्याला मूल नको असं वाटायचं, हे आठवूनही खरं वाटत नाही.’ हे पुस्तक वाचतांना, विशेषत: ‘संगोपन’ वाचतांना त्यांनाच काय, पण आपल्यालाही हे खरं वाटत नाही. 🙂

——- oOo ——-

स्वतःविषयी हे पुस्तक म्हणून खूप परिणामकारक आहे. केवळ आत्मपर साहित्यलेखन यापलीकडे ते खूप काही आहे आणि हे यश केवळ अनिल अवचट यांच्या साध्या, सरळ आणि चित्रमय शैलीचं नाही. हे पुस्तक त्यांना वेगळ्या वाटेने जगतांना आलेल्या अनुभवांच्या नोंदींचे (memoirs ) आहे. त्यात कुठेही बडेजाव, आढ्यता नाही. हे अनुभव रोजच्या जगण्यातील आहेत – कुठल्याही क्रांतीच्या रोमहर्षक कथा नाही. कित्येक वेळा असे वाटते, अरे इतक्या साधेपणे आणि सहजपणे आपल्यालाही जगता आले तर? अर्थातच ते साधं आणि सहज असलं तरी सोपं नाही.

अनिल अवचट आज यशस्वी लेखक आहेत आणि त्यांच्या इतर छंदांना, सामाजिक कामांनाही प्रसिद्धी मिळाली आहे. आजची त्यांची जीवनशैली उच्च- मध्यमवर्गीय, सुखवस्तू आहे. पण जेव्हा डॉक्टरी न करता त्यांनी ही वेगळी वाट स्वीकारली तेव्हा सगळी अनिश्चितताच होती. किंबहुना आधीच्या दिवसात पैशाची ओढाताण, दुरावलेले नातेसंबंध आणि इतर अनेक अडचणीच होत्या. जमेला काही होते तर सुनंदाची समंजस साथ आणि भक्कम पाठींबा – ह्या जोरावरच ते यशस्वी झाले. खरंच कौतुक वाटते त्यांच्या निर्णयाचे जेव्हा आर्थिक स्थैर्य, सुबत्ता देणारी डॉक्टरी न करता त्यांनी फक्त लिखाण व सामाजिक कार्य करायचे ठरवले. त्या वेळेस पुढे काय होईल हे माहित नव्हते. ते conviction वेगळंच असलं पाहिजे. दाद द्यावीशी वाटते ह्याच ‘follow your instincts‘ वृत्तीला!

त्यांच्या ह्या लिखाणातून जाणवते की त्यांचे छोटे-मोठे आनंद, समरसतेने आणि सकारत्मकतेने (positively) जगणे हे पैशांवर किंवा materialistic possessions वर फारसे अवलंबुन नाही. त्यांचे आनंद त्यांच्या सर्जनशीलतेतून निर्माण झाले आहेत, त्यांनी जोडलेल्या माणसांतून, त्यांच्या नात्यांतून निर्माण झाले आहेत. हा आनंद, हे समाधान, ही प्रसन्नता त्यांच्या व्यक्तिमत्वात तर जाणवतेच पण लिखाणातही दरवळते! Erich Fromm चे एक ‘To Have Or To Be’ नावाचे पुस्तक आहे. (I am dying to get my copy of this original book!) त्या पुस्तकात त्याने materialistic possessions (To Have ) आणि enjoying life & its little pleasures (To Be) ह्याविषयी लिहिले आहे. अनिल अवचट ह्यांचे ‘स्वतःविषयी’ वाचून वाटते की त्यांना हे खरंच उमगले आहे! 🙂

Review by – Manish Hatwalne

August 17, 2007

पुस्तक रसग्रहण : जगण्यातील काही (वर्षा महाजन)

Filed under: Books — Manish @ 5:01 pm

Jaganyatil Kaahi by Anil Awachat“जगण्यातील काही” हे पुस्तक जेंव्हा पहील्यांदा वाचले तेंव्हा मी खुपच भावुक झाले होते.अनिल अवचटांची तो पर्यन्त बरीचशी पुस्तके वाचुन झाली होती, म्हणजे जवळ जवळ सगळीच पण हे पुस्तक मला मनाने त्यांच्या खुप जवळ घेऊन गेले.ऒर्कुटच्या कम्युनिटी मधले सगळे जण ठरल्या प्रमाणे भेटलो तेंव्हा मी परिक्षणासाठी घाई घाईत हे पुस्तक घेऊन टाकले आणि मग परत वाचताना अस वाटले की ह्यातले अर्ध तरी पुस्तक लिहावे लागणार परिक्षणात! अर्थात हे परिक्षण नाही. बाबाचे हे पुस्तक ज्यांनी वाचले नाही त्यांच्यासाठी पुस्तकाबद्दल सांगतीये अस समजुन हे लिहिले आहे. मुळातच अनिल अवचटांचे लिखाण हे घडलेले जसेच्य तसे मांडणे ह्या धरती वर आहे. साधेपणा, अचुक उदाहरण आणि अर्थपुर्ण शब्द ह्याने ते तो प्रसंग आपल्या डोळ्या समोर ऊभा करतात. त्या सगळ्याचे परीक्षण कसे करणार?

पुस्तक वाचताना “मेथीची भाजी”, “पोहण”, “आड”, “देवघर”, ” गुरुजी”, “फोना”, “तिसरा मजला”, “शाळा”, “मालकाचा मुलगा”, “मुंज”, “देऊळ” ह्या गोष्टीत ओतुर ह्या त्यांच्या गावात घडलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या घटना त्यांनी खुप बारकाव्यांसहीत लिहिल्या आहेत. “आड” गोष्टीत पाणी काढतानाची प्रक्रिया आणि त्या अनुशंगाने तिथे निर्माण होणारे चित्र आणि आवाजहे वाचताना आपल्याला त्या ठिकाणी घेउन जातात. तसेच “मेथीची भाजी” च्या शेवटी मुक्ताला सागंताना ते जे बोलतात त्याने आपले मन पण भरुन येते, कुठे तरी आपण ही त्या घटनेचे साक्षीदार झालेलो असतो.

“फर्ग्युसन कॊलेज”, “लोकमान्य नगर” ह्या गोष्टीमधे त्यांनी आपल्या पुण्यातील शिकत असतानाच्या वास्तव्याबद्दल लिहिले आहे. त्या वेळेस वाटलेल्या आणि केलेल्या गोष्टी बाबानी बिनधास लिहिल्या आहेत. इतक्या वर्षांनी पण अवचटांना हे प्रसंग नावासकट आठवतात हे ऐक आश्चर्य आहे, ते पण बारिक बारकाव्यानीशी. पुस्तक वाचताना अगदी साध्या घटनेतुन पण उत्सुकता वाढत जाते.

“ठाण्याचा पाऊस”, “ठाण्याचं घर” वाचताना कुठल्याही माणसाच्या आयुष्यात येऊ शकण्यारा घटना लिहील्या आहेत. ते सगळे वाचताना अस अस वाटते की आपल्या समोर हे सगळ घडत आहे.आयुष्यात माणुस कस शिकत जातो, निसर्ग कसा त्याला शिकवतो ते खुप छान/सुंदर मांडले आहे.हे सगळे वाचताना अनेक वेळा वाटुन जाते की असं आपल्याला पण जगता यायला हवे. हा साधेपणा सहज साध्य नाही म्हणुन लेखक आणि लिखाण खुपच ग्रेट!

“घर”, “तुरुंग”, “हार्ट अट्क”, “पक्षी” आणि “हनीमून” ह्या काही गोष्टीं मध्ये बाबानी त्याच्या आयुष्यातल्या काही घटनांबद्दल सविस्तर लिहीले आहे. ते कुठेही अप्रामाणिक वाटत नाही.अस वाटतं की हे सगळ असच भरभरुन आपण पण जगुन घ्यावेत. अस जगणं हा ऐक छान अनुभव आहे पण त्यासाठी जगण्याकडे जगण्याकडे बघण्याचा द्रुष्टिकोण तसा निकोप हवा.

“ऒपरेशन” “दोन मुली”, “रिया” मधे समाजात आलेले वाईट अनुभव पण लेखकाने काहीही कडवट पणा न येऊ देता वर्णन केला आहे. “एक सह प्रवास” वाचताना तर ह्या सगळ्याचा हेवा वाटायला लागतो.

हे पुस्तक वाचताना लेखकाचा जगण्यातील काही दिवसांबद्दल छोट्या छोट्या प्रसंगाचे वर्णन केले आहे.वाचताना आणि नंतर पण बरेच दिवस हे पुस्तक माझ्या मनात राहिले. खुप काही घेण्या सारखे आहे ह्या पुस्तकातुन. पण तस पाहिले आणि विचार केला तर लक्षात येते की हे इतके सोप्प नाहीये. ह्या सगळ्या मागे लेखकाची मनोवृत्ती आणि जगण्याची ध्येय वेगळी आहेत हे विषेश जाणवते.

ह्या सगळ्यातुन आपण काही घेऊ शकलो तर घेऊ शकलो तर खरच किती बर होइल!


जगण्यातील काही : वर्षा महाजन

Create a free website or blog at WordPress.com.