Anil Awachat (अनिल अवचट)

February 17, 2008

पुस्तक रसग्रहण : छंदाविषयी (रामेश्वर महाले)

Filed under: Books — Manish @ 4:09 pm

chhandavishayi1.jpgआपल्या मुलाकडे बोट दाखऊन एक शिक्षक असलेला माणूस म्हणाला ,”हा चित्र चांगलं काढतो म्हणून चित्रकलेच्या क्लासला घालावं म्हणतो;पण पुढे त्याचा काय फायदा ?”
शिक्षक असलेल्या माणसाने असं विचारावर काय उत्तर देणार ?

एखादा छंद माणसाला नक्की काय देतो ? हा खरंच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे.

या प्रश्नाचं नेमकं उत्तर नाही देता येणार;पण एका माणसाला दहा-बारा वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतील तर………

तर माझ्या शिक्षक मित्राला मी अनिल अवचट यांचं ‘छंदाविषयी’ हे पुस्तक वाचायला देईल.

चित्रकला,स्वयंपाक,ओरिगामी,फोटोग्राफी,लाकडतील शिल्पं,बासरी,वाचन आणि अजुन कितीतरी छंदांविषयी माहिती देणारे हे पुस्तक वाचनीय आणि छन्दिष्टानसठी अनुकरणीय आहे. “एखाद्या नव्या गोष्टीकडे लक्ष वेधले जाते आणि आपण त्याच्या मागे लागतो,तो शिकण्याचा काळ मला फार रम्य वाटतो.आपली बोटे हळूहळू वळू लागतात,डोकं त्या दिशेने चालून पकड घेऊ लागते आणि आपल्याही हातातून किंवा गळ्यातून ती नवी गोष्ट उमटू लागते.मग त्याचे वेड लागते. तीच गोष्ट अनेकदा करू लागतो.नंतर ती दुसर्‍याला देऊ लागतो.प्रत्येक पायरीचा आनंद वेगवेगळा असतो.” अशा शब्दांत प्रस्तावनेतच आपली भूमिका लेखक स्पष्ट करतात.

चित्रकलेचं वेड अवचटना लहानपणापासूनच असल्याचं स्पष्ट होतं. त्यांचा चित्रकलेवरचा लेख म्हणजे मनोहर नावाच्या चित्रकार मित्राची गोष्ट आहे. आपल्या ओघवत्या शैलीत लेखक चित्रकलेचा विकास कसा कसा होत गेला, मनोहारकडून चित्र ‘बघायला’ कसं शिकले हे सांगतात. लहानपणी पाटीवर काढत असलेल्या शिवाजी पासून ओइल पेनटिंग्ज आणि हल्ली छोट्या कार्डावर काळ्या पेनने काढलेली चित्र हा प्रवास मुळातूनच वाचण्यासारखा आहे.

या लेखात त्यांनी कॉलेजात असताना पुतळा बनवल्याची गोष्ट सांगतात आणि लाकडातून शिल्प बनवण्याची प्रेरणा कशी मिळाली हे कळते. स्वयंपाक करायला लेखक गारजेपुरता शिकले तरी नंतर त्या प्रांतात ते कसे शिरत गेले;कोणा कोणा कडून काय काय शिकत गेले हे इतक्या सुरेखपणे सांगतात की असं वाटावं -अवचट भाजी चिरता चिरता काही टिप्स देताहेत आणि आपण समोर बसून ऐकतोय. स्वयंपाक ही सुद्धा एक कला आहे आणि पुरूष मंडळीही त्यात कसे पारंगत होत जातात हे जरूर वाचायला हवं.
एका मित्राच्या जपानी पेनफ्रेंड्ने कागदाचा पक्षी पाठवला आणि एका नव्या कागदी जगाची ओळख झालीं हे अजबच वाटतं. अतिशय चिकटीने पाठपुरावा करत त्यांनी ही कला आत्मसात केली आहे.प्रवासात,एखाद्या कार्यक्रमात,अगदी सिनेमा बघतांनाही ते ओरिगामी करतात-अशी ही चौकोनी कागद घेऊन करता येण्यासारखी कला. याचप्रमाणे लेखक आपल्या फोलोग्राफी,बासरी,वाचन या छांदांची गोष्ट सांगतात. लेखक असूनही आपलं वाचन कसं मर्यादित होतं हेही ते सहजपणे सांगून टाकतात.

‘इतर छंद’ या शेवटच्या लेखात दोरिचे खेळ,जादू,बाजा असे एक एक छंद सांगत जातात आणि हा म्हणजे एकदम खल्लास माणूस आहे याची खात्रीच पटते. आपल्या छांदांविषयी सांगत असतांना लेखक आजूबाजूच्या लोकांच्या कॉमेन्टसचा उल्लेख करत जातात आणि ते वाचतांना मजा येते-विशेषता: मुक्ता आणि यशोदा लक्षात राहतात त्या यामुळेच.या आपल्या मुलींनाच त्यांनी पुस्तक अर्पण केलंय;तसेच पुस्तकाचा चौकोनी आकार आणि मुखप्रुष्ठ्ही लक्षात राहतं.आतील काही पानांवर छापलेली चित्र ,ओरिगमीचे फोटो,लाकडतील शिल्पांचे फोटो अशांमुळे पुस्तक आपोआपच संग्रही (आणि थोडे महागही!) झाले आहे.

अतिशय साध्या-सोप्या भाषेत लिहिलेले हे लेख वाचणार्‍या प्रत्येकाला नक्कीच काहीतरी छंद जोपासायला लावतील यात शंका नाही.


छंदाविषयी : रामेश्वर महाले

February 11, 2008

अनिता अवचट स्म्रृतीदिन – प्रांजली अरेकर

Filed under: Events — Manish @ 12:30 pm

काल दि.१०.०२.०८ रोजी ११ व्या अनिता अवचट स्म्रृतीदिनानिमीत्त “संघर्ष सन्मान पुरस्कार” वितरणास जाण्याचा योग आला. आणि अक्षरश: कालची संध्याकाळ खुप श्रीमंत करुन गेली. गांजवे चौकातील एस.एम.जोशी सभागृहात ठीक ६.०० वा्जता कार्येक्रम सुरु झाला तो यशोने तीच्या सुंदर आवाजात गायलेल्या आईच्या आवड्त्या भजनाने.”वैष्णव जन तो” ने एकदम वेगळ्याच वातावरणात नेऊन ठेवले.

डॊ.आनंद नाडकर्णीनी सुत्रसंचालनाची सुत्रे घेतली आणि पुढचे २ ते २.३० तास मिस्कीली करत अजिबात कंटाळा येऊ न देता रंगतदार शैलीत पुरस्कार विजेत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. “संघर्ष सन्मान पुरस्कार”हे नावच किती समर्पक आहे ना! आणि विशेष जाणवले ते मुक्तांगण मित्रचा साधेपणा. सगळा कार्येक्रम एकदम घरगुती वातावरणातला. कुठे डामडौल नाही की मिरवामिरवी नाही. प्रत्येक जण आपल्याला दिलेले काम न बोलता व्यवस्थीत करत होता मग ते आलेल्या मान्यवरांचे स्वागत असो वा स्टॊलवरती बाबाच्या पुस्तकांची विक्री असो. परत सगळे अगदी साध्या वेशात नाहीतर पुरस्कार वितरण म्हणजे तर जरीच्या साड्या, सुट आणि दिमाख,रुबाब ह्यांने भरलेला लग्नसमारंभ असतो. सुनंदाताई आणि बाबाने बाणवलेला साधेपणा सगळीकडे भरुन राहीला होता.

बाबाच्या बहिणीने ज्यांना सगळे प्रेमाने फुलाआत्या म्हणतात त्या प्रफुल्लाताईंनी आपले मनोगत मांडत सुनंदाताईंच्या आठवणी जाग्या केल्या. अजुनही त्यांची ऊर्जा मुक्तांगणमध्ये भरुन राहीलेली जाणवते हे एकुन खरंच वाटले की एकदा तरी सुनंदाताईंची भेट व्हायला हवी होती.

पुरस्कार विजेते होते राष्ट्र्पतीपुरस्कारविजेते आणि १५० हुन अधिक निर्मलग्रामे साकारणारे डॊ. अविनाश पोळ आणि मुकबधिर नॄत्यांगना प्रियांका ऊर्फ प्रेरणा आणि तिला अतिशय चांगल्या प्रकारे वाढवणारे तिचे आईवडिल उज्ज्वला व केशव सहाणे.

डॊ. अविनाश ह्यांनी अतिशय खुमासदार शैलीत गावात शौचालये व इतर मुलभुत सोयीसुविधा उभारताना सरकारी यंत्रणेपासुन गावकर्यांच्या असहकार धोरणापर्यंत कश्या अडचणी आल्या ते सांगितले. एका दंतशल्यविशारदाने परदेशात जाऊन पैसे न कमावता आपल्या गावाच्या सुधारणेसाठी इथेच राहुन अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीमध्ये आपले ध्येय साध्य केले ते खरोखरच हसवता हसवता खुप विचार करायला लावणारे होते.

उज्ज्वला व केशव सहाणे ह्यांचे मनोगत तर प्रेक्षकांना वारंवार डोळे पुसायला लावत होते. इतका संघर्षमय प्रवास दोघांनी इतक्या सच्चेपणाने सांगितला की त्यांना सुद्धा २-३दा हेलावल्यासारखे झाले. आंतरजातीय विवाहामुळे घरचा आधार तुटलेला त्यात प्रियांका ६ महीन्यांची असतानाच ती चालु शकत नाही हे त्यांना समजले आणि काही दिवसांनी ती ऐकु शकत नाही हे लक्षात आले. आत्महत्येचा विचार पक्का झाला असताना उज्ज्वलालाईंच्या बहिणीने “हेलन केलरचे” पुस्तक देऊन परिस्थीतीशी लढण्याचे बळ दिले आणि जिद्दीने झगडत आज प्रियांकाला (जीचे नाव आता प्रेरणा ठेवले आहे )असे घडवले की ती आज उत्तम भरतनाट्यम करते. तिचे अरंगेत्रम पर्यंत शिक्षण झाले असुन ती सर्वसामान्य मुलींना आता भरतनाट्यम शिकवते.

एकुणच ह्या संघर्षाबद्द्ल लिहावे तेवढे थोडेच पण मुक्तांगण आणि बाबासारखे लोक असे परिस्थितीशी लढ्णारे लोक शोधुन काढतात आणि त्यांचा सन्मान करतात ह्यावरुन अजुनही कुठे तरी कोसळणार्या माणसांना सावरणारी माणसे कमी असली तरी अगदीच काही अंधार नाही असे वाटले.

बाबा आज आम्ही तुला “बाबा” म्हणतो ह्याचा मनापासुन फार अभिमान वाटतो. आणि असे समृद्ध करणारे अनुभव दिल्याबद्द्ल तुझे ,मुक्ताचे, यशोचे आणि सुनंदाताईंचे लाखो धन्यवाद !!!!!


Author : Pranjali Arekar

Blog at WordPress.com.