Anil Awachat (अनिल अवचट)

February 27, 2007

बाबाची भेट

Filed under: General — yogesh @ 11:12 am

बर्‍याच दिवसांपासून मुक्तांगण पाहण्याची, अनिल अवचटांना (बाबा) भेटण्याची, जमल्यास मुक्तांगणसाठी आपण काय करु शकतो हे जाणून घेण्याची इच्छा होती.

ओरकुटवर अनिल अवचट कम्युनिटी सुरु झाल्यावर तिथे जॉईन झालेले लोक पाहिले तेव्हा म्हटलं जगात माझ्यासारख्या वेड्यांची कमतरता नाही, एक शोधा हजार मिळतील. 🙂 तिथल्याच एका टॉपिकमध्ये अजित बाबांना भेटून आल्याचं वाचलं आणि त्याचा विलक्षण हेवा वाटला. म्हटलं आपली कधी भेट होणार? पुढं बाबांचा कोणालातरी लिहिलेला एक स्क्रॅप वाचला.

[ हो, स्वत: डॉ अनिल अवचट आमच्या कम्युनिटीचे सदस्य आहेत 🙂 आणि मी दुसर्‍यांचे स्क्रॅप वाचतो! खरं बोलायला कसली आलीये भीती!]

त्या स्क्रॅपमध्ये बाबाने “मुक्तांगण विषयी सर्वांना उत्सुकता दिसते. मुक्तांगण ही प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे आणि येण्यासाठी योग्य दिवस आहे म्हणजे महिन्याचा शेवटचा शनिवार.” असं सांगितलं होतं. फेब्रुवारीचा शेवटचा शनिवार जवळ आलाच होता. त्यामुळे २४ फेब्रुवारीची तारीख नक्की करुन ज्यांची मुक्तांगणला भेट देण्याची इच्छा होती त्यांनी सकाळी दहा वाजता थेट मुक्तांगणलाच यावं असं ठरलं.

पुण्याचे अजित, नीलकांत, मनीष, त्रिशूल आणि मुंबईहून गीतांजली, तेजश्री, आशीष आणि नागेश यांनी येण्याचं नक्की केलं. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच अस्मादिकांची स्वारी मुक्तांगणच्या गेटवर उभी राहिली. पाचदहा मिनिटातच मुंबईकर लोक व अजित स्वत: बाबांसह मुक्तांगणमध्ये दाखल झाले. गाडीतून बाबांना उतरताना पाहिल्यावर माझ्या छातीची धडधड धडधड सुरु झाली. आता पहिलं वाक्य काय म्हणायचं? का पाया पडू? नको तसं केलं तर जास्त नाटकी वाटतं… वगैरे मनात थोडासा गोंधळ झाला.

एक तर काही वर्षांपूर्वी आरशात पाहून प्रॅक्टीस करुन करुन देखील प्रेमाचा ‘इजहार’ केल्यावर आमच्या प्रियेने नकार दिल्यावर माझा आरशातल्या प्रॅक्टीसवरचा विश्वासच उडून गेला होता. त्यामुळं बाबासमोर काय बोलायचं याची प्रॅक्टीसदेखील केली नव्हती. तेवढ्यात बाबाच बाकीच्यांबरोबर माझ्याजवळ चालत आला आणि माझा हात हातात घेऊन विचारलं “तुझं नाव काय?” मी लगेच नाव बिव सांगून टाकलं. मागून कुणीतरी “हाच तो, ज्याने इकडं यायचा इनिशिएटिव्ह घेतला होता” असं म्हटलं. बाबा म्हणाला, “अच्छा, मग याला काय शिक्षा द्यायची आता?” सगळे हसले मग बाबाबरोबर आम्ही सगळे आतमध्ये गेलो.

मुक्तांगणच्या स्वागतकक्षामध्ये आमची ओळख बाबाने त्याचे ओरकुटवरचे मित्र अशी करुन दिल्यावर उगाचच कॉलर टाईट झाली. नंतर आम्ही बाबाच्या केबिनमध्ये जाऊन बसलो. बाबाने सगळ्यांशी ओळख करुन घेतल्यावर मुक्तांगणविषयी थोडी माहिती दिली. आम्ही नंतर दत्ता श्रीखंडे या कौन्सेलरसोबत मुक्तांगण फिरण्यासाठी बाहेर पडलो. बाहेर पडण्यापूर्वी “आता तुम्ही इथंच जेवून जायचं” असा पुण्यात सहसा केला न जाणारा आग्रह देखील केला गेला. 🙂

दत्ता श्रीखंडे हे स्वत: मुक्तांगणमध्येच व्यसनमुक्त झालेले आणि गेली १५-२० वर्षं तिथं कौन्सेलिंगचं काम करणारे कौन्सेलर. त्यांनी मुक्तांगणची रुग्ण दाखल करुन घेण्याची पद्धत, दारुड्यांचे निरनिराळे प्रकार, त्यांना बरं करण्याची पद्धत ह्याच्यावर एकदम डिटेल माहिती दिली. त्याविषयी नंतर कधीतरी लिहीन.

मुक्तांगणमध्ये दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी तिथल्या व्यसनमुक्त झालेल्या रुग्णांच्या व्यसनमुक्तीचा वाढदिवस साजरा केला जातो. ह्या कार्यक्रमात व्यसनमुक्त झाल्यानंतर आयुष्यात झालेला बदल, व्यसनाधीन असताना हेटाळणी करणारे कुटुंबीय व समाज आता कसे चांगले वागतात वगैरे अनुभव मुक्तांगणमधून व्यसनमुक्त झालेल्यांनी सांगितले. कार्यक्रमात व्यसनमुक्तांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. नंतर बाबाने त्याचं म्हणणं थोडक्यात सांगून सगळ्यांकडून गाणी म्हणवून घेतली.

हा कार्यक्रम संपल्यावर आता जेवण करुन घरी जायचं या विचाराने थोडं मन खिन्न झालं अजून थोडा वेळ बाबाबरोबर घालवता आला असता तर बरं झालं असतं असं वाटलं. कार्यक्रमाच्या हॉलबाहेर आलो तर स्वत: बाबाच म्हणाला की दुपारी साडेतीन वाजता नक्की घरी येऊन जा. हा तर आम्हाला बोनसच होता. 🙂 जेवण वगैरे संपवून मग साडेतीन कधी वाजतात याची मग वाट बघू लागलो.


पुण्यात इतकी वर्षं राहून पण मला बाबा राहतो ते पत्रकारनगर माहिती नव्हतं. त्यामुळे नीलकांत, मनीष वगैरे लोकांच्या मदतीने बाबाच्या घराजवळ जाऊन पोचलो. तीन वाजून पंचवीस मिनिटं झाली होती. “साडेतीनपर्यंत वर जायला नको, उगाच बाबा झोपलाबिपला असायचा. आपण दिलेल्या वेळेलाच जाऊ. तोपर्यंत मुंबईकर लोक येतील.” असं मनीषने सुचवलं. पाच मिनिटं थोडा टीपी करुन मग मनीषने तेजश्रीला फोन लावला तर हे लोक आधीच बाबाच्या घरी पोचले होते. 🙂 “मुंबईकर लोकांचं असंच… दिलेल्या वेळेला येणार नाहीत आधीच पोचतील” असा शेरा मनीषने मारला. (सॉरी मनीष ;))मग बाबाच्या घरी गेलो. बाबा त्याच्या घराचं दार नेहमीच उघडं ठेवतो. कडी वगैरे काही नाही.बाबाने स्वत:विषयी, छंदांविषयी वगैरे पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणेच घरात एक माळा, त्याच्यावर जाण्यासाठी पायर्‍या, बाबाच्या खोलीत पुस्तकांचा पसारा वगैरे होताच. बाबा बेडवर बसला होता. त्याच्या शेजारच्या जागा आमच्याआधी आलेल्या मुंबईकरांनी आधीच पटकावल्या असल्यामुळे आम्हाला अर्थातच बाबासमोर खुर्चीवर बसायला लागलं. बाबाची मुलगी यशोदाताईही तिच्या नवर्‍यासोबत तिथे होती.अगदी जुने मित्र पुन्हा भेटावेत अशा थाटात बाबाने गप्पा सुरु केल्या. त्याच्या पुस्तकांप्रमाणेच बाबा विलक्षण अनौपचारिक आहे. आम्हाला जरा रिलॅक्स व्हा, टेकून वगैरे बसा, मस्त पाय पसरून बसा वगैरे सांगून वर “तुम्ही”, “डॉक्टर” वगैरे काही म्हणायचं नाही. “ए बाबा” असं म्हणायचं असं प्रेमाने दटावलं. हातातल्या लाकडाच्या शिल्पावर बाबाचं काम सुरु होतं. बाबाने त्याचं आवडतं पुस्तक वॉल्डन आणि त्याचा लेखक हेन्री डेव्हिड थोरो याच्याविषयी बोलायला सुरुवात केली. अमेरिकेतील भोगवादी आणि निसर्गापासून दूर चाललेल्या समाजाला वैतागून नदीच्या किनार्‍यावर राहायला गेलेला थोरो. त्याच्या जीवनापासून गांधीजींना मिळालेली असहकार आंदोलनाची प्रेरणा वगैरे गोष्टींची बाबाने नेहमीप्रमाणेच अगदी साध्या शब्दात सुरेख माहिती दिली.घरगुती, सुती कपडे घातलेला बाबा अगदी प्रसन्न वाटत होता. मग बाबाने आणि यशोताईने गाणी म्हणायला सुरुवात केली. एखाद्या लहान मुलाप्रमाणे असणारा बाबाचा उत्साह पाहून आम्हीही मग त्याच्या सोबत गाण्याचा(!) प्रयत्न करु लागलो. बाबाने बासरीवर “तुम आये तो आया मुझे याद” वगैरे गाणी वाजवून दाखवली.

तेवढ्यात आमच्यासाठी चहा आला :). चहा वगैरे पिऊन झाल्यावर मग मुक्तांगणसाठी व व्यसनमुक्तीसाठी आम्ही काय काय करु शकतो याविषयी बाबाने सांगायला सुरुवात केली. पहिली गोष्ट म्हणजे स्वत: या व्यसनापासून दूर राहणे :). आपल्या परिचयातील लोकांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना व्यसनाचे गांभीर्य व त्याबाबत मुक्तांगण कशी मदत करु शकते याची माहिती देणे. मुक्तांगणच्या सतत संपर्कात राहणे. आपण मुक्तांगणसाठी काय काय करु शकतो हे स्वत:च ओळखणे वगैरे अनेक गोष्टी सांगितल्या. पुन्हा एकदा एक-दोन गाणी म्हटल्यावर मग बाबाने त्याने पत्रा वापरुन केलेली ओरिगामी दाखवली. (हे करताना त्याच्या बोटाला लागलंही आहे)

हळूहळू आमचा वेळ संपत चालला होता. पण पाय मात्र तिथून निघत नव्हता. पण मुंबईकरांची गाडी चुकेल म्हणून बाबानेच मग लवकर निघा, मधून मधून येत चला वगैरे सांगितलं. मग शेवटी निघालोच.

त्याच्या घरी जाताना वाटत होतं आपल्या आवडत्या लेखकाला भेटायला चाललो आहोत… आणि घरुन निघताना मात्र एका अतिशय प्रेमळ, हरहुन्नरी, लहानांहून लहान तरीही सर्वांपेक्षा खूप खूप मोठ्या एका खर्‍या खुर्‍या माणसाला भेटल्याचा आनंद मनात भरुन राहिला होता.

आणि हो… खास आमच्यासाठी बाबाने आणलेलं कलिंगड खायचं राहिलंच. बाबा ते बाजूला ठेवणार आहे… पुढच्या भेटीच्या वेळी खाण्यासाठी.

4 Comments »

 1. Thanks a ton Yogesh, for adding this article here!!! 🙂

  Comment by Manish — March 1, 2007 @ 11:36 am | Reply

 2. Nice !!

  Comment by Rupali — March 10, 2007 @ 11:32 am | Reply

 3. Nice post!!

  Comment by Rupali — March 14, 2007 @ 8:42 pm | Reply

 4. […] बरेचसे नवीन चेहरेही होते जे मागील मुक्तांगण भेटीच्या वेळेस नव्ह्ते; त्यातील काही बाबाला […]

  Pingback by बाबाशी ‘ह्या हृदयीचे त्या हृदयी’ « Anil Awachat — June 25, 2007 @ 5:26 am | Reply


RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

%d bloggers like this: